‘२८ ऑगस्टपर्यंत चूक दुरुस्त करा, नाहीतर…’; जरांगेंचा बावनकुळेंना थेट इशारा!

विशेष प्रतिनिधी

पुणे : मराठा आरक्षण आणि कुणबी जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना २८ ऑगस्टपर्यंत कथित चूक दुरुस्त करण्याचा इशारा दिला आहे. रद्द करण्यात आलेली चार कुणबी जात प्रमाणपत्रे पुन्हा वैध करून द्यावीत, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.

दरम्यान, आपल्या टीकेमुळे बावनकुळे भावूक झाल्याचे पाहून वाईट वाटल्याचेही जरांगे यांनी म्हटले. नुकतेच बावनकुळे यांनी जरांगे यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना कुटुंबीयांनाही त्याचा त्रास होत असल्याचे सांगितले होते. यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते.

यावर बोलताना जरांगे म्हणाले, “पत्रकारांनी मला सांगितले की बावनकुळे यांच्या डोळ्यात पाणी आले. मीही ते पाहिले. तुम्ही तुमच्या आईचे नाव घेतले. शेवटी ती मायमाऊली आहे. तुमच्या आईविषयी तुमचे जे मत आहे, तेच आमचेही आहे. आम्ही मराठे भावनिक आहोत.”

‘यापुढे वैयक्तिक व्यंग करणार नाही’

बावनकुळे यांच्यावर यापुढे वैयक्तिक स्वरूपाचे व्यंग करणार नसल्याचे जरांगे यांनी स्पष्ट केले. “मी तुम्हाला पहिल्यांदा माफ करतो. यापुढे तुमच्यावर व्यंग करणार नाही. आम्ही मराठे आहोत, एकदा-दोनदा माफ करतो आणि सोडून देतो. पण पुन्हा चूक झाली तर तुम्हाला सोडणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.

“माझे माझ्या मराठा समाजातील बांधवांवर खूप प्रेम आहे. समाजाच्या विरोधात कोणी आले, मग तो कोणीही असो, मी त्याला सोडत नाही,” असेही जरांगे म्हणाले.



‘२८ ऑगस्टपर्यंत चारही प्रमाणपत्रे पुन्हा वैध करा’

कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून जरांगे यांनी बावनकुळे यांच्यावर थेट निशाणा साधला. “तुम्ही चूक केली. परळीच्या टोळीच्या नादी लागून मराठा समाजाच्या लेकरांचे नुकसान केले. त्यांचे ऐकायला नको होते. यापुढे त्या टोळीच्या नादी लागू नका,” अशी टीका त्यांनी केली.

तसेच, “२८ ऑगस्टच्या आत पत्र देऊन केलेली चूक दुरुस्त करा. राजकीय दबावापोटी रद्द करण्यात आलेली चारही प्रमाणपत्रे पुन्हा वैध करून द्या. तसे केले नाही तर पुन्हा मी सोडणार नाही,” असा इशारा जरांगे यांनी दिला.

चार कुणबी प्रमाणपत्रांवरून वाद

मराठवाड्यातील चार मराठा लोकप्रतिनिधींना मिळालेली कुणबी जात प्रमाणपत्रे अवैध ठरवण्यात आल्याच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. या निर्णयामागे राजकीय दबाव असल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला असून, त्यांनी बावनकुळे यांना लक्ष्य केले आहे.

मात्र, बावनकुळे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. बीड जिल्हा प्रशासनानेही एका प्रमाणपत्राच्या प्रकरणात जरांगे यांच्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रमाणपत्रे रद्द करण्यामागे थेट राजकीय हस्तक्षेप झाल्याचा आरोप अद्याप सिद्ध झालेला नाही.

२९ ऑगस्टच्या आंदोलनापूर्वी जरांगेंची डेडलाइन

मनोज जरांगे यांनी यापूर्वीच २९ ऑगस्टपासून मराठा आरक्षणासाठी निर्णायक आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बावनकुळे यांना दिलेली २८ ऑगस्टची मुदत महत्त्वाची ठरत आहे. आता या मुदतीत शासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते आणि चार कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर तोडगा निघतो का, याकडे मराठा समाजासह राज्याचे लक्ष लागले आहे.

“Rectify the mistake by August 28, or else…” – Jarange’s direct warning to Bawankule!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात