विशेष प्रतिनिधी
पुणे : अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे आपल्या कडक आणि परखड कार्यशैलीसाठी ओळखले जातात. मात्र, पुण्यातील एका प्रकट मुलाखतीत त्यांनी आपल्या आयुष्यातील काही रंजक आठवणी सांगतानाच आगामी काळातील कारवाईचे संकेतही दिले. Tukaram Mundhe
लेखक अरविंद जगताप यांनी घेतलेल्या या प्रकट मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी पुण्यातील आपल्या पहिल्या अनुभवापासून ते पहिल्यांदा खाल्लेल्या चायनीज खाद्यपदार्थापर्यंत अनेक आठवणी सांगितल्या. याचवेळी सध्या FDAकडून सुरू असलेल्या कारवायांच्या पार्श्वभूमीवर चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील पहिला अनुभव बस स्टँड ते विद्यापीठ
पुण्यात एमएच्या प्रवेशासाठी आलेला आपला पहिला अनुभव सांगताना मुंढे यांनी वसतिगृह न मिळाल्याचा किस्सा सांगितला.
बीए पूर्ण केल्यानंतर एमएला प्रवेश घेण्यासाठी आपण पहिल्यांदा पुण्यात आलो होतो. एसटीच्या बसने शिवाजीनगर बस स्थानकावर उतरल्यानंतर तेथून विद्यापीठात पायी गेल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, प्रवेश मिळण्याची शक्यता असली तरी वसतिगृह उपलब्ध नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
त्यानंतर एसपी कॉलेजमध्ये प्रवेशाचा प्रयत्न करण्याचा सल्ला मिळाला. मात्र, तेथेही वसतिगृहाचा प्रश्न कायम होता. अखेर संध्याकाळच्या बसने घरी परतण्याचा निर्णय घेतला.
“माझा पुण्याचा पहिला प्रवास बस स्टँड, विद्यापीठ, एसपी कॉलेज आणि पुन्हा बस स्टँड एवढाच झाला,” अशी आठवण त्यांनी सांगितली.
‘पुण्याशी माझी अशी ओळख झाली’
पुण्यात प्रवेश न मिळाल्यानंतर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रवेश घेतला आणि यूपीएससीची तयारी करत एमएचे शिक्षण पूर्ण केले.
यूपीएससीच्या तयारीसाठी पुण्यात आल्यानंतर ते जयकर ग्रंथालयात अभ्यास करत होते. पुणे विद्यापीठात राज्यशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या मित्राच्या खोलीत शेअरिंगवर राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
मात्र, त्या खोलीत मोठ्या प्रमाणात ढेकणं असल्याने झोपणेही कठीण झाले होते. “मित्राने आधी सांगितले असते तर कदाचित आलोच नसतो. पुण्याशी माझी अशी ओळख झाली,” असे मुंढे यांनी मिश्कीलपणे सांगितले.
पुण्यात पहिल्यांदा चायनीज खाल्लं; आता पुन्हा लक्ष?
पुण्यातील खाद्यसंस्कृतीचा उल्लेख करताना तुकाराम मुंढे यांनी आपल्या आयुष्यातील पहिल्या चायनीज खाद्यपदार्थाची आठवण सांगितली.
बापट रोड किंवा पाषाण रोड परिसरात चायनीज खाद्यपदार्थांच्या गाड्या असायच्या. त्याच ठिकाणी आपण आयुष्यात पहिल्यांदा चायनीज फूड खाल्ल्याचे त्यांनी सांगितले.
“चायनीज फूड काय असतं, हे त्यावेळी मला माहिती नव्हतं. आता त्याची मोठी मागणी आहे. गेल्या दोन महिन्यांत झालेल्या कारवायांनंतर चायनीजकडेही लक्ष द्या, असे सांगितले जात आहे. त्यामुळे चायनीज फूडकडे थोडं लक्ष द्यायचं आहे,” असे मुंढे यांनी सांगितले.
FDAचा मोर्चा आता चायनीज खाद्यपदार्थांकडे?
तुकाराम मुंढे यांच्या या वक्तव्यामुळे FDAच्या आगामी कारवाईबाबत चर्चा सुरू झाली आहे. अन्न सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांची तपासणी करण्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत.
त्यामुळे FDAचा पुढील मोर्चा चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉल्स आणि आस्थापनांकडे वळणार का, याकडे आता लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App