विशेष प्रतिनिधी
नाशिक: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेवर आणि स्पर्धा परीक्षांच्या व्यवस्थापनावर जोरदार टीका केली. चीनमधील परीक्षा पद्धतीचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील वाढता संताप व्यक्त केला आणि सरकारला शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न विचारले.
नाशिक दौऱ्यावर असताना माध्यमांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, “जंतरमंतरवरील आंदोलन ही केवळ सुरुवात आहे. विद्यार्थ्यांच्या मनात आणि त्यांच्या पालकांमध्ये व्यवस्थेविरोधात प्रचंड नाराजी आहे. हा संताप पुढील काळात अधिक तीव्र होऊ शकतो.”
ते म्हणाले की, स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास ढासळत आहे. “जंतरमंतरवर आंदोलन सुरू असतानाही पेपर फुटत होते. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला तर त्यात त्यांची चूक काय?” असा सवाल त्यांनी केला.
शिक्षण व्यवस्थेवर टीका करताना त्यांनी कोचिंग क्लास संस्कृतीवरही निशाणा साधला. “विद्यार्थी दिवसाचे आठ-आठ तास क्लासमध्ये घालवत असतील तर महाविद्यालयांचे काम नेमके काय? सर्वच कोचिंग क्लास चुकीचे नाहीत, पण अनेक ठिकाणी हा केवळ व्यवसाय बनला आहे. आतापर्यंतच्या अनेक पेपरफुटीच्या प्रकरणांमध्ये कोचिंग क्लासचे नाव समोर आले आहे,” असे ते म्हणाले.
महाविद्यालयांच्या शुल्काच्या तुलनेत कोचिंग क्लासची फी अनेक पटीने जास्त असल्याकडे लक्ष वेधत त्यांनी, “महाविद्यालयाची फी २० हजार रुपये आणि कोचिंग क्लासची फी लाखोंमध्ये असते. क्लासमध्ये उपस्थिती लावल्यानंतर महाविद्यालयात उपस्थिती कशी लागते? ही शिक्षण व्यवस्था गंभीरपणे तपासण्याची गरज आहे,” अशी टीका केली.
नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचाही त्यांनी उल्लेख केला. “नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. अशा घटना अत्यंत वेदनादायी आहेत. देशातील विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. त्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही, तर विद्यार्थ्यांचा रोष वाढत जाईल,” असे राज ठाकरे म्हणाले.
शेवटी त्यांनी सरकारला शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याचे आवाहन करत, “ही शिक्षण पद्धती बदलण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करून चालणार नाही,” असे स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App