विशेष प्रतिनिधी
मुंबई : Mumbai FDA हॉटेलमध्ये जाऊन जेवणाऱ्या खवय्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) मुंबईतील भेंडीबाजार आणि उमरखाडी परिसरातील 3 अत्यंत नामांकित हॉटेल्सचे परवाने थेट निलंबित केले आहेत. स्वयंपाकघरातील अस्वच्छता, कीटकांचा वावर आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.Mumbai FDA
कोणत्या हॉटेल्सवर झाली कारवाई?
FDA चे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यात अन्नसुरक्षा विभागाकडून धडक कारवाया सुरू आहेत. याच मोहिमेअंतर्गत मुंबईतील अत्यंत प्रसिद्ध असलेल्या ‘शालिमार हॉस्पिटॅलिटी’, ‘नूर मोहम्मदी हॉटेल’ आणि ‘रहमानिया रेस्टॉरंट’ या तीन मोठ्या हॉटेल्सवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.Mumbai FDA
कारवाईचे मुख्य कारण काय?
अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या अचानक तपासणीत या हॉटेल्सच्या किचनमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. स्वयंपाकघरात प्रचंड अस्वच्छता आणि कीटकांचा वावर आढळून आला. पिण्याच्या पाण्याबाबतचे अनिवार्य नियम पाळले गेले नव्हते. कच्च्या मालाच्या खरेदीच्या नोंदी आणि खाद्यतेलाच्या गुणवत्तेच्या नोंदी तपासणी अधिकाऱ्यांना आढळल्या नाहीत.
या सर्व गंभीर त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी या तीनही हॉटेल्सचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच, अमरावतीमधील ‘अमरावती दरबार’ या हॉटेललाही वैध परवान्याशिवाय व्यवसाय करत असल्यामुळे हॉटेल बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.
हॉटेलचालकांसाठी FDA चे 5 कडक नियम: या कारवाईसोबतच FDA ने सर्व हॉटेल्ससाठी काही अत्यंत कडक सूचना जारी केल्या आहेत, ज्यांचे पालन करणे आता बंधनकारक असणार आहे:
मोफत आणि स्वच्छ पाणी: हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना मोफत आणि स्वच्छ पिण्याचे पाणी देणे सक्तीचे आहे. ग्राहकाला बाटलीबंद (मिनरल) पाणी विकत घेण्यासाठी बळजबरी करता येणार नाही.
शाकाहारी-मांसाहारीसाठी वेगळी व्यवस्था: शाकाहारी आणि मांसाहारी अन्नपदार्थांची साठवणूक आणि ते बनवण्याची जागा पूर्णपणे वेगळी असावी. तसेच दोन्हीसाठी वेगवेगळे चॉपिंग बोर्ड वापरणे बंधनकारक आहे.
जळालेल्या तेलावर बंदी: एकदा तळण्यासाठी वापरलेले काळे किंवा जळालेले तेल पुन्हा वापरण्यास सक्त मनाई आहे.
वृत्तपत्रात पार्सल देण्यास बंदी: ग्राहकांना वृत्तपत्राच्या कागदात अन्नपदार्थ पॅक करून देता येणार नाहीत. त्यासाठी फक्त ‘फूड-ग्रेड रॅपिंग पेपर’चाच वापर करावा लागेल.
कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी: हॉटेलच्या किचनमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची दरवर्षी वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक आहे. तसेच स्वयंपाकघरात तंबाखू, गुटखा खाण्यास किंवा थुंकण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App