वृत्तसंस्था
नवी दिल्ली : EPFO कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या ऑनलाइन प्रणालीत मोठे तांत्रिक बदल करत असून, त्यासाठी 26 जून ते 28 जून या कालावधीत ऑनलाइन क्लेम प्रोसेसिंग पोर्टल पूर्णपणे बंद राहणार आहे. डेटाबेस एकत्रीकरण (Database Consolidation) आणि सॉफ्टवेअर अपग्रेडेशनच्या कामामुळे या तीन दिवसांत पीएफशी संबंधित अनेक ऑनलाइन सेवा उपलब्ध होणार नाहीत.EPFO
EPFO ने जारी केलेल्या सूचनेनुसार, 26 जून रोजी रात्री 12 वाजल्यापासून 28 जून रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन क्लेम दाखल करणे, त्यावर प्रक्रिया करणे तसेच इतर डिजिटल सुविधा बंद राहतील. 29 जूनपासून सर्व सेवा पुन्हा पूर्ववत सुरू होतील.EPFO
कोणत्या सेवांवर होणार परिणाम?
या कालावधीत सदस्यांना नवीन पीएफ विड्रॉल, ट्रान्सफर किंवा इतर ऑनलाइन क्लेम दाखल करता येणार नाहीत. याशिवाय, 26 जूनपूर्वी दाखल केलेल्या अर्जांवरील प्रक्रियाही या तीन दिवसांत थांबवली जाणार आहे. पोर्टल सुरू झाल्यानंतरच त्यावर पुढील कार्यवाही केली जाईल.
तसेच ई-पासबुक, ईसीआर फाइलिंग, UAN खाते लिंक करणे यासारख्या सेवाही या कालावधीत उपलब्ध राहणार नाहीत. त्यामुळे तातडीने पीएफची रक्कम काढण्याची गरज असलेल्या सदस्यांनी याची नोंद घ्यावी.
सिस्टम अधिक सक्षम करण्यासाठी अपग्रेडेशन
EPFO ने स्पष्ट केले आहे की, भविष्यात अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवा देण्यासाठी हे सिस्टम मायग्रेशन आणि सॉफ्टवेअर अपग्रेडेशन केले जात आहे. डेटाबेस अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया नियोजित वेळापत्रकानुसार राबवली जात आहे.
संस्थेने सदस्यांची गैरसोय झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, आवश्यक मदतीसाठी EPFO च्या अधिकृत हेल्पलाइन क्रमांक 14470 वर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
लवकरच UPI आणि ATM मधून PF काढण्याची सुविधा
या तांत्रिक बदलांनंतर EPFO आपल्या सदस्यांसाठी आणखी एक मोठी सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे. लवकरच सदस्यांना UPI आणि ATMच्या माध्यमातून पीएफची रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.
यासाठी EPFO विशेष अॅप विकसित करत असून ते थेट सदस्यांच्या बँक खात्याशी आणि UPI प्लॅटफॉर्मशी जोडले जाईल. या सुविधेमुळे पारंपरिक ऑनलाइन क्लेम प्रक्रियेऐवजी अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने पैसे काढता येणार आहेत.
नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर सदस्यांना त्यांच्या पीएफ खात्यातील शिल्लक रकमेपैकी 75 टक्क्यांपर्यंतची रक्कम तातडीने काढण्याची सुविधा मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पीएफमधील पैसे मिळवण्यासाठी लागणारा वेळ आणि प्रक्रिया दोन्ही मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App