विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: राजकारणात पूर्णवेळ काम करूनही नियमित आर्थिक उत्पन्न मिळत नसल्याने राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी स्पष्ट केले आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कौतुक करतानाच काँग्रेस आणि राजकीय घराणेशाहीवर जोरदार टीका केली. shahzad Poonawalla
भाजपचा राजीनामा आणि राजकारणातून बाहेर पडण्यामागील कारण सांगताना त्यांनी आर्थिक वास्तव मांडले. “मला घराचे भाडे भरावे लागते. मी भाजपचा नेता आहे म्हणून घरमालक मला मोफत राहू देणार नाही. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला भाडे द्यावेच लागते. राजकीय पक्ष कार्यकर्त्यांना किंवा प्रवक्त्यांना पगार देत नाहीत,” असे त्यांनी सांगितले.
२४ तास आणि वर्षाचे ३६५ दिवस राजकीय काम करूनही त्यातून आर्थिक उत्पन्न मिळत नसल्याने उदरनिर्वाहासाठी खासगी क्षेत्रात काम शोधणे आवश्यक झाल्याचे पूनावाला यांनी स्पष्ट केले.
पूनावाला म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून काम केल्यानंतर एखाद्या छोट्या पक्षात जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा महान नेता या देशात झाला नाही आणि होणारही नाही. सध्याच्या परिस्थितीत भाजप हाच भारतातील सर्वोत्तम पक्ष आहे,” असा दावा त्यांनी केला.
काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, या प्रश्नावर पूनावाला यांनी उपरोधिक उत्तर दिले.“राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका वाड्रा यांना पक्षातून हटवले आणि जवाहरलाल नेहरूंच्या कृतींबद्दल माफी मागितली, तरच काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार करेन,” असे त्यांनी म्हटले.
राजकीय घराणेशाहीवर टीका करताना पूनावाला यांनी राजकारणातील लोकांचे दोन प्रकार असल्याचे सांगितले.
“एक ‘लेता’, म्हणजे भ्रष्टाचार करून पैसे घेणारे आणि दुसरे ‘बेटा’, म्हणजे राजकीय नेत्यांची मुले. मी या दोन्ही प्रकारांत बसत नाही. मी पहिल्या पिढीचा राजकीय कार्यकर्ता आहे,” असे ते म्हणाले.
सचिन पायलट आणि इतर राजकीय घराण्यांतील नेत्यांचा उल्लेख करत त्यांनी पहिल्या पिढीतील कार्यकर्त्यांकडे तशी आर्थिक पार्श्वभूमी किंवा आलिशान जीवनशैली नसल्याचेही म्हटले.
दरम्यान, जुलैअखेरीस पूनावाला यांनी त्यांच्या समाजमाध्यम खात्यांवरून भाजपशी संबंधित माहिती हटवल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती. त्यांनी भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे आपला राजीनामा स्वीकारण्याची विनंती केल्याचेही सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App