विशेष प्रतिनिधी
नाशिक : Rupali Chakankar राज्याला हादरवून सोडणाऱ्या नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता राजकीय धागेदोरे अधिक घट्ट होताना दिसत आहेत. या प्रकरणाच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्री रूपाली चाकणकर यांची तब्बल ६ तास कसून चौकशी केली. एसआयटी प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी स्वतः दोन तास चाकणकरांना प्रश्नांच्या फेऱ्यात पकडले होते.Rupali Chakankar
अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आल्यापासून त्यांना एसआयटी नोटीस बजावणार असल्याची चर्चा होती. सुरुवातीला आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचे सांगणाऱ्या चाकणकर आज अखेर नाशिक येथे एसआयटी चौकशीला सामोरे गेल्या. सकाळी सुरू झालेली ही चौकशी सायंकाळपर्यंत सुरू होती. यापूर्वी चाकणकर यांच्या बहिणीचीही एका पतसंस्थेतील आर्थिक व्यवहाराप्रकरणी चौकशी झाली होती, त्या पार्श्वभूमीवर आजची चौकशी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.Rupali Chakankar
प्रश्नांची सरबत्ती: पूजा-विधी आणि आर्थिक धागेदोरे
मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीने चाकणकर यांच्यावर प्रश्नांची मोठी सरबत्ती केली. अशोक खरातसोबत तुमचे नेमके कधीपासून संबंध होते? खरातसोबत केलेले पूजा-विधी नेमके कोणते होते आणि त्यामागे काही आर्थिक व्यवहार दडले होते का? ‘शिवनिका’ संस्थेच्या बैठकींमध्ये नेमके काय कामकाज चालायचे? त्यावेळेस खरातच्या गैरप्रकारांची तुम्हाला माहिती होती का? खरातच्या मंदिरात येणारे इतर राजकीय नेते कोणाच्या सांगण्यावरून येत होते? खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ नेमके कोणत्या कार्यक्रमातील आणि कधीचे आहेत? असे प्रश्न रूपाली चाकणकरांना विचारण्यात आले.
चौकशीनंतर रूपाली चाकणकर काय म्हणाल्या?
एसआयटी पथकाकडून चौकशी संपल्यानंतर बाहेर पडताच रूपाली चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, “तपास यंत्रणेला जे काही आवश्यक होते, त्यात मी पूर्ण सहकार्य केले आहे. मी एसआयटीच्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली असून माझी बाजू सविस्तरपणे मांडली आहे. या चौकशीचा अहवाल लवकरच तुमच्यापर्यंत येईल.” अधिक भाष्य करणे टाळत त्या तात्काळ पुण्याच्या दिशेने रवाना झाल्या.
बहिणीचीही झाली होती चौकशी
यापूर्वी एसआयटीने रूपाली चाकणकर यांच्या बहिणीचीही चौकशी केली होती. एका पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक व्यवहारांच्या संदर्भात ही चौकशी झाली होती. अशोक खरातच्या पोलीस कोठडीत वारंवार वाढ होत असताना, आता उच्चपदस्थ राजकीय व्यक्तींची चौकशी सुरू झाल्याने या प्रकरणाला मोठे वळण मिळाले आहे.
विरोधकांकडून चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी
मुख्य आरोपी अशोक खरातसोबतचे काही फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांनी गंभीर आरोप केले होते. चाकणकर या खरातला आपला ‘गुरू’ मानत असल्याने त्यांनी यापूर्वीच्या काही प्रकरणांत राजकीय हस्तक्षेप केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी लावून धरली होती.
पदाचा राजीनामा
वाढत्या राजकीय दबावामुळे चाकणकर यांनी अखेर राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून, आजची ही चौकशी या प्रकरणातील पुढील दिशा ठरवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App