नाशिक : तामिळनाडू मध्ये TVK पक्षाचा नेता विजय जोसेफ यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन आज जोरदार भाषण ठोकले खरे, त्यानंतर त्याने निर्णयांचा धडाका लावला खरा, पण विजयच्या पक्षाला काठावरचे बहुमत असल्याने विजय पुढे खरे आव्हान आहे, ते निर्णयांमधला धडाका आणि बोलण्यातला तडाखा टिकवण्याचे!!, हेच राजकीय वास्तव आज समोर आले. C Joseph Vijay
काँग्रेस आणि इतरांच्या टेकूचे सरकार
विजय जोसेफ याच्या TVK पक्षाला पहिल्याच विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले, पण पूर्ण बहुमत मिळवण्यात अपयश आले. बहुमतासाठी दहा आमदारांची गरज असताना ती पूर्ण करण्यासाठी विजयला चार दिवस लागले. बाकी सगळ्या पक्षांनी विजयला खेळवत ठेवले. शेवटी तामिळनाडू राष्ट्रपती राजवट लागायचा धोका उत्पन्न झाल्यानंतर द्रविड मुन्नेत्र कळघमने मोठा राजकीय डाव खेळून व्हीसीके पक्षाला विजयच्या सरकारला पाठिंबा द्यायला लावला. त्यामुळे विजय याचा आज मुख्यमंत्री पदावर शपथविधी होऊ शकला.
उत्साहाच्या भरात प्रोटोकॉल तोडला
पण आजच्या शपथविधी समारंभात विजय याने फारच उत्साहात येऊन प्रोटोकॉल तोडला. शपथविधी समारंभात राज्यघटनेनुसार शपथ घेण्याऐवजी विजयने जोरदार भाषणबाजीच केली. शेवटी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांना विजयला राज्यघटनेनुसार शपथ घेण्याची सूचना करावी लागली. त्यानंतर विजयने राज्यघटनेने घालून दिलेल्या चौकटीनुसार शपथ घेतली.
सत्ता केंद्र संदर्भात राहुल गांधींना इशारा
पण विजयने शपथ घेतल्यानंतर सुद्धा जोरदार भाषण ठोकले. त्या भाषणात विजयने राहुल गांधी यांच्यासमोर आपण स्वतःच तामिळनाडूतले सत्ता केंद्र असल्याचे सांगितले. तामिळनाडूमध्ये मीच सत्ता केंद्र असेन. इतर कोणीही सत्ता केंद्र नसेल. मी माझ्या पद्धतीने काम करेन. मी चुकीचे काम करणार नाही, पण इतर कुणालाही चुकीचे काम करू देणार नाही. मी कोणाचाही दबाव सहन करणार नाही, अशी भाषा विजयने राहुल गांधी यांच्यासमोर वापरली.
निर्णयांचा धडाका
त्यानंतर विजय याने मुख्यमंत्री पद स्वीकारल्यावर लगेच तीन निर्णयांच्या फाईलींवर सही केली. यामध्ये 200 युनिट पर्यंत वीज मोफत देण्यापासून ते महिला पोलीस भरतीच्या विषयापर्यंतचा समावेश होता. हे सगळे विषय तामिळनाडूच्या जनतेच्या कल्याणाचे होते, यात शंका नाही. पण हे सगळे विजय याने स्वतःचे बहुमत नसताना केले.
काँग्रेस कधी दाखविणार हिसका??
त्यामुळेच वर उल्लेख केल्याप्रमाणे विजय जोसेफ याच्यापुढे निर्णयांमधला धडाका आणि बोलण्यातला तडाखा टिकवण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. विजय याने राहुल गांधी यांच्यासमोर आपण एकटाच सत्तेचा केंद्रबिंदू असल्याचे सांगणे काँग्रेसला टोचल्याशिवाय राहणार नाही आणि काँग्रेस हा काही भाजप सारखा पक्ष नाही, की जो राहुल गांधींचा कुठला उपमर्द सहन करू शकेल. वेळ येताच काँग्रेस विजयला हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही. विजयचे अल्पमतातले सरकार काँग्रेसच्या पाच आमदारांवर अवलंबून आहे. शिवाय व्हीसी के पक्षाचे दोन आमदार, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दोन आमदार आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगचे दोन आमदार अशा सहा आमदारांचा विजयच्या सरकारला पाठिंबा आहे. या सगळ्या आमदारांचा पाठिंबा गृहीत धरून विजयने जर भाषणातून दमबाजी केली असेल, तर त्याला नजीकच्या भविष्यात त्याची राजकीय किंमत चुकविल्याशिवाय गत्यंतर नाही, हे लवकरच त्याला दिसून येईल. कारण त्याला लवकरच विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागेल.
chief C Joseph Vijay records a video on his phone with Lok Sabha LoP & Congress MP Rahul Gandhi
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App