‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत धुळ्यात महिला शेतकरी मेळावा; आर्थिक स्वावलंबन, आधुनिक शेती आणि शासकीय योजनांच्या लाभावर भर
विशेष प्रतिनिधी
धुळे : शेतात राबणारी महिला ही केवळ शेतीचा आधार नसून संकटाच्या काळात संपूर्ण कुटुंबाला सावरणारी खरी ताकद आहे. पेरणी, निंदणी, कोळपणीपासून घर आणि मुलांची जबाबदारी सांभाळण्यापर्यंत महिला शेतकऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे महिलांच्या कष्टांचा गौरव करण्याबरोबरच त्यांना समान संधी, आर्थिक स्वावलंबन आणि योग्य सन्मान मिळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. Jaykumar Rawal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आलेल्या ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत कृषी विभाग, आत्मा, धुळे आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हिरे भवन येथे महिला शेतकरी मेळावा व प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केले.
महिला शेतकऱ्यांच्या कष्टांची दखल घेण्याची गरज
महिला शेतकऱ्यांच्या कामाला वेळेचे बंधन नसते. घर, मुले, शेती आणि कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना त्या स्वतःच्या कष्टांची पर्वा करत नाहीत. कुटुंबावर आर्थिक संकट आले किंवा अडचणी निर्माण झाल्या, तरी खंबीरपणे उभे राहून परिस्थितीला सामोरे जाण्याचे सामर्थ्य महिलांमध्ये असते, असे रावल म्हणाले.
खानदेशातील महिलांचे शेती क्षेत्रातील योगदान मोठे आहे. त्यांची भूमिका केवळ शेतावर जेवणाचा डबा पोहोचविण्यापुरती मर्यादित नसून शेतीच्या विविध कामांमध्ये त्या सक्रिय सहभाग घेतात. शेती टिकविण्यासोबतच पुढील पिढीचे भविष्य घडविण्यातही त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे, असे त्यांनी नमूद केले.
महिला सक्षमीकरणातून विकसित भारताचे स्वप्न
भारतीय संस्कृतीत मातृशक्तीला नेहमीच महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. मात्र, महिलांचा सन्मान केवळ उत्सव किंवा सत्कारापुरता मर्यादित न राहता त्यांच्या अधिकारांमध्ये, आर्थिक स्थितीत आणि प्रगतीच्या संधींमध्येही दिसला पाहिजे. महिलांना योग्य संधी मिळाल्यास त्या कुटुंबासह गावाच्या विकासालाही हातभार लावू शकतात, असा विश्वास रावल यांनी व्यक्त केला.
सन २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्याच्या ध्येयात महिलांचा सहभाग समान असणे आवश्यक आहे. लखपती दीदी योजना, महिला शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजना आणि बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी आधुनिक शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींचा लाभ घ्यावा. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास कुटुंबाचे शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.
महिलांना कोणतीही अडचण आल्यास मदतीसाठी आपण सदैव तत्पर असल्याचे सांगत रावल यांनी, “तुमचा जयकुमार भाऊ तुमच्यासाठी सदैव तत्पर आहे. तुमची कामे मार्गी लावण्यासाठी निश्चित प्रयत्न करेन,” असा विश्वास महिला शेतकऱ्यांना दिला.
शेतीपूरक व्यवसायांसाठी कर्ज आणि प्रशिक्षणाच्या संधी
आमदार मंजूळा गावित यांनी महिलांनी आर्थिक स्वावलंबनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. महिला बचत गटांनी प्रामाणिक कर्जफेडीतून शासन आणि बँकांचा विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे नव्या उद्योगांसाठी १० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतात काम करणाऱ्या महिलांनी ‘शेतकरी महिला प्रमाणपत्र’ मिळवावे. सातबाऱ्याची अट शिथिल झाल्याने या प्रमाणपत्राच्या आधारे गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेचा लाभ मिळू शकतो, असे त्यांनी नमूद केले. लखपती दीदी आणि ड्रोन दीदी योजनांसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेवगा पावडर निर्मिती, बेकरी, शिलाई आणि शेतीपूरक व्यवसाय सुरू करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महिलांच्या आयुष्यात प्रत्यक्ष परिवर्तन घडावे
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी महिला शेतकऱ्यांच्या योगदानाची दखल घेताना, त्यांचा सन्मान केवळ सत्कार आणि प्रमाणपत्रांपुरता मर्यादित न राहता त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्ष परिवर्तन घडले पाहिजे, असे स्पष्ट केले.
महिलांनी आपल्या गरजा, अडचणी आणि व्यवसायवाढीच्या अपेक्षा प्रशासनापर्यंत पोहोचवाव्यात. कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. महिलांनी अधिकाऱ्यांना शेतावर बोलावून प्रत्यक्ष अडचणी दाखवाव्यात आणि उपलब्ध योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
महिलांनी आयुष्मान भारत कार्ड, ॲग्रीस्टॅक अर्थात फार्मर आयडी आणि इतर शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. आयुष्मान कार्डसाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, यासाठी दिवाळीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात विक्री मेळावा आयोजित करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.
महिलांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘डबा पार्टी’सारखे उपक्रम राबवून शेती, शासकीय योजना, पशुसंवर्धन आणि मत्स्यपालनातील संधींवर चर्चा करण्याची तयारी त्यांनी व्यक्त केली. उपलब्ध जलसाठ्यांचा उपयोग करून महिलांनी मत्स्यव्यवसायातही पुढे यावे, असे आवाहन केले.
शेतकरी कुटुंबातील महिलांना आधार देण्यावर भर
शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर त्याच्या पत्नीला आणि कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा महिलांच्या संघर्षाकडे विशेष लक्ष देऊन त्यांना आधार देणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी विसपुते यांनी सांगितले. महिला शेतकऱ्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी कृषी विभागाने १० ते ५० महिलांचे गट तयार करून त्यांचा अभिप्राय प्रशासनापर्यंत पोहोचवावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
“तुम्ही महिला हीच माझी खरी शक्ती आहात. तुमच्यामुळे आम्ही आहोत; आमच्यामुळे तुम्ही नाही,” अशा शब्दांत विसपुते यांनी महिलांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आवश्यक सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी व्यक्त केली.
आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रदर्शन
मेळाव्यात आधुनिक शेती तंत्रज्ञान, महिला शेतकरी सक्षमीकरण, महिला व बालकांचे पोषण आणि आरोग्य, शेतमाल प्रक्रिया, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय, बचत गट आणि विविध शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कृषी प्रदर्शनातून महिलांना उपयुक्त माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाला आमदार मंजूळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुरज जगताप, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. गिरीश पाटील, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त डॉ. जयेश बलकटे, महिला व बालविकास विभागाचे कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि महिला शेतकरी उपस्थित होत्या.
महिला शेतकऱ्यांच्या कष्टांना योग्य मोबदला, त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ आणि आर्थिक प्रगतीसाठी आवश्यक संधी मिळाल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळू शकते. महिलांना सन्मानासोबत स्वावलंबनाची संधी देण्याचा संदेश या मेळाव्यातून देण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App