विशेष प्रतिनिधी
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशभरात राबवण्यात येत असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेवरून (SIR) विरोधकांनी ‘मतचोरी’ आणि कोट्यवधी मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करत गैरसमज निर्माण करण्यास सुरूवात केली आहे. त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळा घषत सोशल मीडियावर (X/ट्विटर) सविस्तर माहिती प्रसिद्ध करत ‘गैरसमज विरुद्ध वस्तुस्थिती’ जनतेसमोर मांडली आहे. राज्यातील जनतेला आवाहन करताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी आजच मतदारयादीतील आपले नाव, पत्ता व इतर तपशील तपासून घ्यावेत आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क सुरक्षित ठेवावा. Devendra Fadnavis
मुख्यमंत्र्यांनी आठ प्रमुख आक्षेपांचे खंडन करत निवडणूक प्रक्रियेतील कायदेशीर बाजू स्पष्ट केली आहे. एसआयआर प्रक्रियेबाबत पसरवले जाणारे 8 गैरसमज आणि वस्तुस्थिती :
1. पात्र मतदारांची नावे सरसकट कापली जातात का?
पसरवला जाणारा गैरसमज: ‘SIR’ प्रक्रियेमध्ये पात्र मतदारांची नावेही कोणतीही शहानिशा न करता सरसकट वगळली जातात. नेमकी वस्तुस्थिती: ‘SIR’ मोहिमेचा मूळ उद्देश कोणाचाही हक्क हिरावणे नसून मतदारयादी अद्ययावत आणि शुद्ध करणे हा आहे. नागरिकांनी आपले नाव यादीत तपासावे; समजा नजरचुकीने नाव वगळले गेले असल्यास तात्काळ दुरुस्तीसाठी किंवा फेरसमावेशासाठी अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे.
2. यादीतून नाव गेले तर पुन्हा नोंदणी अशक्य आहे का?
पसरवला जाणारा गैरसमज: एकदा का मतदारयादीत नाव नसेल, तर ते पुन्हा कधीही समाविष्ट करता येत नाही. नेमकी वस्तुस्थिती: हा पूर्णपणे खोटा प्रचार आहे. कोणताही पात्र भारतीय नागरिक ‘फॉर्म 6’ भरून आपले नाव पुन्हा मतदारयादीत समाविष्ट करण्यासाठी अर्ज करू शकतो. त्यामुळे नागरिकांनी नोंदणी प्रलंबित न ठेवता तातडीने अर्ज करावा.
3. एआय (AI) संगणक प्रणाली परस्पर नावे वगळते का?
पसरवला जाणारा गैरसमज: मतदारयादीत नाव ठेवण्याचा किंवा वगळण्याचा अंतिम निर्णय कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आपोआप घेते. नेमकी वस्तुस्थिती: एआय (AI) किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केवळ मतदारयादीतील एकसारख्या किंवा दुबार नोंदी शोधून काढण्यासाठी केला जातो. मात्र, नाव समाविष्ट करण्याचा किंवा वगळण्याचा कायदेशीर आणि वैधानिक निर्णय केवळ मतदार नोंदणी अधिकारीच (ERO) घेतात, संगणक नव्हे!
4. प्रत्येकाला सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात का?
पसरवला जाणारा गैरसमज: पडताळणीसाठी प्रत्येक मतदाराला स्वतः कागदपत्रे घेऊन निवडणूक कार्यालयात जावे लागते. नेमकी वस्तुस्थिती: प्रत्येकाला कार्यालयात जाण्याची गरज नाही. अनेक प्रकरणांमध्ये घरोघरी येणाऱ्या बूथ लेव्हल ऑफिसरकडे (BLO) कागदपत्रे सुपूर्द करता येतात. केवळ काही विशिष्ट किंवा शंकास्पद प्रकरणांमध्येच प्रत्यक्ष सुनावणीला उपस्थित राहावे लागू शकते. त्यामुळे अधिकृत सूचनांकडे दुर्लक्ष करू नये.
5. एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव असल्यास चालते का?
पसरवला जाणारा गैरसमज: एकाच व्यक्तीचे नाव गावाकडे आणि शहरात अशा दोन किंवा अधिक ठिकाणच्या मतदारयादीत असले तरी चालते. नेमकी वस्तुस्थिती: लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदार म्हणून नाव ठेवण्यास किंवा दुबार नोंदणीस सक्त मनाई आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या नोंदींची अचूकता तपासून एकाच ठिकाणचे नाव कायम ठेवावे.
6. नवीन मतदारांना मोहीम संपेपर्यंत वाट पाहावी लागते का?
पसरवला जाणारा गैरसमज: १८ वर्षे पूर्ण झालेल्या किंवा नवीन मतदारांना ‘SIR’ प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नोंदणीसाठी थांबावे लागते. नेमकी वस्तुस्थिती: नवीन मतदारांना थांबण्याची अजिबात आवश्यकता नाही. निवडणूक आयोगाच्या निर्धारित पात्रता दिनांकानुसार पात्र ठरणारे नागरिक केव्हाही ‘फॉर्म 6’ द्वारे नवीन नोंदणीसाठी अर्ज करू शकतात.
7. नाव आणि पत्त्यातील चुका सुधारता येत नाहीत का?
पसरवला जाणारा गैरसमज: मतदारयादीत एकदा चुकीचे नाव, वय किंवा पत्ता छापून आला तर तो दुरुस्त करता येत नाही. नेमकी वस्तुस्थिती: मतदारयादीतील आपले नाव, पत्ता, छायाचित्र किंवा इतर कोणताही चुकीचा तपशील दुरुस्त करण्यासाठी निवडणूक आयोगाने ‘फॉर्म 8’ची सुविधा दिलेली आहे. त्याद्वारे सहज दुरुस्ती करता येते.
8. नाव वगळल्यास दाद मागता येत नाही का?
पसरवला जाणारा गैरसमज: मतदारयादी संदर्भात अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयाविरोधात कुठेही अपील किंवा तक्रार करता येत नाही. नेमकी वस्तुस्थिती: निवडणूक नियमांनुसार मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रीतसर अपील करता येते. यासंदर्भात अधिक मदतीसाठी आणि मार्गदर्शनासाठी नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलचा किंवा 1950 या टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांकाचा वापर करावा.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App