IIT मुंबईच्या मेसवर FDAचा छापा! आत नेमकं काय आढळलं? १० आस्थापनांवर धाडी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आयआयटी मुंबई कॅम्पसमधील दोन कॅन्टीनना नोटीस बजावली आहे. अन्न सुरक्षा मानकांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कार्यप्रणालीत सुधारणा करण्याचे निर्देश आणखी एका कॅन्टीनला देण्यात आले आहेत. तुकाराम मुंढे यांनी एफडीएच्या आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून अन्न सुरक्षेवर सर्वाधिक भर दिला जात आहे. परिणामी कारवाईचे प्रमाण वाढले आहे.

अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर सुरू केलेल्या धडक कारवाईचा फटका आता मुंबईतील नामांकित आस्थापनांनाही बसू लागला आहे. आयआयटी पवई येथील तीन हॉस्टेल मेससह शहरातील १० हॉटेल, रेस्टॉरंट आणि कॅन्टीनची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी चार आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तर पाच आस्थापनांना व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून एका आस्थापनेला सुधारणा नोटीस बजावण्यात आली आहे.

बुधवारी (5 ऑगस्ट) एफडीएच्या अधिकाऱ्यांनी आयआयटी मुंबईमधील विविध कॅन्टीनची तपासणी केली. या तपासणीत असे आढळून आले की, दोन कॅन्टीन भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून आवश्यक असलेला परवाना न घेता कार्यरत होती. यानंतर, अधिकाऱ्यांनी दोन्ही कॅन्टीनना तात्काळ कामकाज थांबवण्याची नोटीस बजावली. तपासणीदरम्यान, एका कॅन्टीनचा FSSAI परवाना वैध असल्याचे आढळून आले, परंतु अन्न तयार करणे, साठवणूक आणि स्वच्छतेसाठी विहित मानकांचे पूर्णपणे पालन केले जात नव्हते. परिणामी, त्रुटी दूर करण्यासाठी आणि आपल्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्यासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.



एफडीएने ४ ते ६ ऑगस्टदरम्यान मुंबईत ही विशेष तपासणी मोहीम राबवली. आयआयटी मुंबईतील तीन हॉस्टेल मेसच्या तपासणीत दोन मेसकडे आवश्यक अन्न परवाना किंवा नोंदणी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे त्या दोन्ही मेसचा अन्न व्यवसाय तातडीने बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. तिसऱ्या मेसमध्ये विविध त्रुटी निदर्शनास आल्याने सुधारणा नोटीस देण्यात आली.

एफडीए अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रार मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तथापि, ही तक्रार आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी केली होती की बाहेरील व्यक्तींनी, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपासणीदरम्यान मोठ्या संख्येने विद्यार्थी कॅन्टीनमध्ये जेवत होते. तपासणीदरम्यान, काही विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना विचारले की कॅन्टीन बंद झाल्यावर जेवणाची व्यवस्था कशी करायची? अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, जवळच वैध एफएसएसएआय परवाना असलेली अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स आहेत आणि ते सध्यापुरते तिथून जेवण मागवू शकतात.

दरम्यान, राज्यभर ४ ऑगस्टपासून सुरू असलेल्या धाडसत्रात प्रतिबंधित पान मसाला, गुटखा यांची विक्री, वाहतूक आणि वितरण करणाऱ्या २२ जणांना अटक करण्यात आली असून २० लाख रुपयांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. याशिवाय दूध, दुग्धजन्य पदार्थ, बेकरी उत्पादने, मसाले, खाद्यतेल आदी अन्नपदार्थांचा तब्बल २ कोटी ६२ लाख ७० हजार १७४ रुपयांचा साठाही जप्त करण्यात आला आहे.

मुंबईतील दादर येथील Eat Nino या हॉटेलमध्ये अस्वच्छ परिसर, घरमाशांचा प्रादुर्भाव, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेचा अभाव, अन्न व पिण्याच्या पाण्याच्या चाचण्यांच्या नोंदी नसणे, FOSTAC प्रशिक्षण व वैद्यकीय नोंदींचा अभाव तसेच GMP आणि GHP नियमांचे उल्लंघन आढळल्याने परवाना निलंबित करण्यात आला.

अंधेरी (पश्चिम) येथील जय माँ काली ढाबा येथे अन्नसाठा शौचालयालगत ठेवणे, गंजलेले रॅक, डिजिटल तापमानमापक नसलेले रेफ्रिजरेटर, अस्वच्छ स्वयंपाकघर आणि उघड्यावर ठेवलेल्या कणकेवर माशांचा वावर अशा गंभीर त्रुटी आढळल्याने कारवाई करण्यात आली.

सांताक्रूझ (पश्चिम) येथील हाऊस ऑफ महाराष्ट्र या आस्थापनात स्वयंपाकघर आणि स्टोअररूममध्ये झुरळांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव, फूड-ग्रेड नसलेले पॅकेजिंग साहित्य, अन्न पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर, पेस्ट कंट्रोलचे प्रमाणपत्र नसणे, गंजलेली स्वयंपाकाची उपकरणे आणि रंग निघालेल्या छतामुळे परवाना निलंबित करण्यात आला.

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात