विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : नाशिकमधील टीसीएसशी संबंधित प्रकरणातील आरोपी निदा खान हिला आपल्या मालमत्तेत आश्रय दिल्याचा आरोप असलेले एमआयएमचे नगरसेवक मतीन माजिद पटेल यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. Nida Khan Case
पोलिसांकडून चौकशीसाठी वारंवार बोलावण्यात येत असतानाही पटेल हजर राहत नसल्याचा आरोप आहे. अखेर गुरुवारी रात्री नाशिक पोलिसांचे पथक छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले. स्थानिक सिडको एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने पटेल यांना त्यांच्या राहत्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले.
प्राथमिक चौकशीनंतर नाशिक पोलिसांनी मतीन पटेल यांना पुढील तपासासाठी थेट नाशिकला नेले.
नाशिकमधील टीसीएस कार्यालयाशी संबंधित कथित लैंगिक छळ आणि धार्मिक दबावाच्या प्रकरणात अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक असलेली निदा खान काही काळ फरार होती.
नाशिक पोलिसांनी मे महिन्यात निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव परिसरातील एका घरातून ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या तपासानुसार ही मालमत्ता मतीन पटेल यांच्याशी संबंधित असल्याचा दावा करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर पटेल यांच्यावर निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणात नाशिक पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातही मतीन पटेल यांचे नाव आरोपी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे.
नाशिक पोलिसांनी यापूर्वी पटेल यांची साडेनऊ तास चौकशी केली होती. त्या चौकशीत पटेल यांनी निदा खानविरोधातील आरोपांची माहिती नसताना तिच्या कुटुंबाला तात्पुरती राहण्याची व्यवस्था करण्यासाठी मदत केल्याचा दावा केल्याचे वृत्त समोर आले होते.
दरम्यान, या प्रकरणात पटेल यांना यापूर्वीही अटक करण्यात आली होती आणि काही काळ ते नाशिकमधील कारागृहात होते. त्यानंतर त्यांना काही अटी आणि शर्तींवर जामीन मिळाल्याची माहिती आहे. मात्र, जामिनानंतरही तपासासाठी आवश्यक तेव्हा हजर राहण्याच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून ते वारंवार चौकशी टाळत असल्याचा पोलिसांचा आरोप आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांनी पुन्हा कारवाई करत त्यांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
आता मतीन पटेल यांची पुढील चौकशी करून निदा खानला आश्रय देण्यामागील नेमकी परिस्थिती, तिच्या वास्तव्याबाबत त्यांना कितपत माहिती होती आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास नाशिक पोलीस करणार आहेत.
या कारवाईमुळे आधीच चर्चेत असलेले टीसीएस प्रकरण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले असून, पुढील तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते याकडे लक्ष लागले आहे. निदा खानला 7 मे 2026 रोजी रात्री छत्रपती संभाजीनगरातून पकडण्यात आले होते, आणि नंतर तिला नाशिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App