विशेष प्रतिनिधी
मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतील तीन खाद्य आस्थापनांवर कारवाई करत त्यांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित केली आहे. यामध्ये परळ येथील डॉमिनोज पिझ्झा आउटलेट, भांडुप पश्चिम येथील माज फूड पार्सल अँड केटरिंग आणि कुर्ला पश्चिम येथील मुगल ढाबा यांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान खाद्यपदार्थांच्या साठवणुकीतील त्रुटी, अस्वच्छता आणि अन्न हाताळणीतील गंभीर निष्काळजीपणा आढळून आला.
परळ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील रंगोली टाइम कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या डॉमिनोज पिझ्झा आउटलेटचा परवाना १२ ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आला. या आउटलेटचे संचालन ज्युबिलंट फूडवर्क्स लिमिटेडकडून केले जाते.
९ ऑक्टोबर रोजी केलेल्या पुनर्तपासणीत शाकाहारी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ एकाच डीप फ्रीजरमध्ये शेजारी ठेवण्यात आल्याचे आढळले. तसेच चिकन आणि पनीर हे पदार्थ एकाच ओव्हन किंवा ग्रिलवर तयार केले जात असल्याचे निरीक्षकांच्या निदर्शनास आले.
यापूर्वी ११ ऑगस्ट रोजी झालेल्या तपासणीनंतर संबंधित आस्थापनाला त्रुटी दूर करण्याची नोटीस देण्यात आली होती. मात्र, पुनर्तपासणीवेळी त्रुटींचे योग्य निराकरण झाले नसल्याचे आढळले. अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पॅकेजिंग साहित्याचा अनुरूपता अहवाल, खाद्यपदार्थ वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांच्या नोंदी आणि उपकरणांच्या प्रतिबंधात्मक देखभालीच्या नोंदीही उपलब्ध नसल्याचे एफडीएने नमूद केले.
भांडुप पश्चिम येथील एलबीएस मार्गावरील सोनापूर परिसरातील माज फूड पार्सल अँड केटरिंगचा परवाना १३ ऑक्टोबर रोजी निलंबित करण्यात आला. तपासणीदरम्यान स्वयंपाकघरात झुरळांचा प्रादुर्भाव, तुंबलेली आणि अस्वच्छ गटारे तसेच लेबल नसलेले तयार खाद्यपदार्थ आढळले. स्वयंपाकघरात कृत्रिम खाद्यरंगही आढळून आला.
याशिवाय मेन्यूमध्ये बटर असा उल्लेख करून प्रत्यक्षात फॅट स्प्रेडचा वापर केला जात असल्याचेही अधिकाऱ्यांना आढळले. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असल्याचे एफडीएने नमूद केले.
कुर्ला पश्चिम येथील एलबीएस मार्गावर कल्पना सिनेमागृहासमोर असलेल्या मुगल ढाब्याविरोधात झोमॅटोवरून मागवलेल्या ऑर्डरमध्ये शिळे अन्न मिळाल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर ८ ऑक्टोबर रोजी तपासणी करण्यात आली. त्यावेळी अन्नकचऱ्यामुळे गटारे तुंबलेली, सांडपाणी साचलेले आणि मागील दरवाजाला कीटकांपासून संरक्षण देणारी जाळी नसल्याचे आढळले.
तसेच गंजलेले रेफ्रिजरेटर, डीप फ्रीजर आणि भांडी, भिंतीवरील उखडलेला रंग व प्लास्टर, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची अपुरी विभागणी तसेच कांद्याच्या साठ्याजवळ उघड्या कचरापेट्या आढळल्या. या गंभीर स्वच्छता त्रुटींमुळे मुगल ढाब्याची नोंदणी निलंबित करण्यात आली. अन्नसुरक्षा आणि मानके कायदा, २००६ तसेच त्याअंतर्गत असलेल्या नियमांचे उल्लंघन झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App