एका बाजूला विषारी घोणस, दुसरीकडे बिबट्याची दहशत; ऊसतोड मजुरांचा जीव धोक्यात

विशेष प्रतिनिधी

बारामती : पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसाच्या फडात दिवसरात्र राबणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या जिवावर आता बिबट्याचेही संकट घोंगावू लागले आहे. ऊस तोडताना घोणससारख्या विषारी सापांच्या दंशाचा धोका कायम असतानाच दौंड तालुक्यातील वाळकी परिसरात एका ऊसतोड मजुरावर बिबट्याने हल्ल्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. प्रसंगावधान राखत मजुराने कोयत्याने प्रतिकार केल्याने तो बचावला. मात्र, या घटनेने ऊसतोड मजुरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

वाळकी परिसरात ऊसतोड सुरू असताना गटलू वामन मैचे हे ऊस तोडण्यासाठी खाली वाकले होते. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर झडप घालत पंजा मारला. अचानक झालेल्या या हल्ल्याने ते क्षणभर गोंधळले; मात्र प्रसंगावधान राखत त्यांनी हातातील कोयत्याने बिबट्याला प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्याने तेथून पळ काढला. या झटापटीत मैचे यांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र, त्यांचा शर्ट फाटला. वनरक्षक अक्षय शितोळे यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर खाली वाकून ऊस तोडणारी व्यक्ती भक्ष्य असल्याचा भास बिबट्याला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक अक्षय शितोळे, वनसेवक सुरेश पवार आणि पोलीस पाटील निळकंठ थोरात यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून परिसरातील नागरिक आणि ऊसतोड मजुरांना सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. भीमा नदीकाठच्या परिसरात यापूर्वीही बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्याने शेतकरी आणि मजुरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

ऊसाच्या फडात रोज नवे संकट….

ऊसतोड मजुरांचे आयुष्य म्हणजे संकटांशी रोजची झुंज. उसाच्या दाट पाचटात लपलेले घोणससारखे विषारी साप, विंचू, कीटक यांचा धोका असतोच. त्यात आता बिबट्यासारख्या हिंस्र प्राण्याच्या हल्ल्याची भीतीही वाढली आहे. अनेकदा पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत शेतात काम करावे लागते. काही मजूर कुटुंबासह स्थलांतर करून येतात. त्यामुळे त्यांच्या लहान मुलांचाही मुक्काम ऊसाच्या फडाजवळ किंवा शेतात उभारलेल्या तात्पुरत्या झोपड्यांमध्ये असतो. अशा परिस्थितीत केवळ मजुरांचीच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांची सुरक्षा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे.

कारखाने आणि प्रशासनाची जबाबदारी काय?

ऊसतोड मजुरांच्या जीविताची जबाबदारी नेमकी कोणाची, हा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होत आहे. साखर कारखान्यांच्या गळीत हंगामासाठी हजारो मजूर कुटुंबांसह गावोगावी येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी कारखान्यांकडून कोणत्या सुविधा पुरवल्या जातात? सर्पदंश किंवा वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या प्रसंगी तातडीच्या उपचारांची व्यवस्था आहे का? मजुरांना सुरक्षा प्रशिक्षण, प्रथमोपचार पेटी, आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि रात्रीच्या वेळी प्रकाशाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते का? अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज आहे. केवळ वनविभागाने जनजागृती करून जबाबदारी संपत नाही. ऊसतोड मजुरांची नोंद ठेवणारे कारखाने, टोळीप्रमुख आणि संबंधित यंत्रणांनीही त्यांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. अपघात घडल्यानंतर मदत करण्यापेक्षा संभाव्य धोके टाळण्यासाठी आधीच यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे, अशी मागणी आता ऊसतोड मुजरांमधून होऊ लागली आहे.

वनविभागाचे खबरदारीचे आवाहन….
बिबट्याचा वावर असलेल्या भागात मजुरांनी एकट्याने ऊसतोड करू नये, शक्यतो समूहाने काम करावे, रात्री बॅटरी सोबत ठेवावी, आवाजासाठी रेडिओ सुरू ठेवावा आणि गळ्यात जाड फडके बांधावे, असे आवाहन वनरक्षक अक्षय शितोळे यांनी केले आहे. ऊसतोड मजुरांच्या मुलांना शेतातील धोक्यांपासून दूर ठेवून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची सूचनाही त्यांनी केली. या वेळी वनविभागाचे कर्मचारी, पोलीस पाटील निळकंठ थोरात, प्रताप गाडेकर, योगेश थोरात, संजय फरतडे आणि बाप्पू मागरे उपस्थित होते.

sugarcane harvesters’ lives are at risk.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात