खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा

विशेष प्रतिनिधी

बारामती : पुणे शहरातून वाहणाऱ्या मुठा उजव्या कालव्यामुळे होणारी पाणीगळती, पाणीचोरी आणि जलप्रदूषण रोखण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या खडकवासला-फुरसुंगी भूमिगत बोगदा प्रकल्पाचे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाच्या मुख्य बोगद्याचे आतापर्यंत सुमारे सहा किलोमीटर खोदकाम पूर्ण झाले असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी २.१८ टीएमसी पाण्याची बचत होणार आहे. विशेष म्हणजे, या बचतीतील पाण्यामुळे दौंड, इंदापूर, हवेली आणि बारामती तालुक्यांतील तब्बल ३ हजार ४७१ हेक्टर क्षेत्राला पुन्हा सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाकडे पुणे जिल्ह्यातील शेतीसाठी महत्त्वाचा जलप्रकल्प म्हणून पाहिले जात आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीने बुधवारी (ता. २४) समितीचे अध्यक्ष आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली खडकवासला-फुरसुंगी बोगदा प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी बोगद्याच्या कामाची प्रगती तपासण्याबरोबरच महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेण्यात आली. कामाचा वेग, निर्धारित कालमर्यादा, निधीची उपलब्धता, बांधकामाचा दर्जा आणि कामगारांच्या सुरक्षेबाबत समितीने माहिती घेतली. प्रकल्पासाठी आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून देण्यासह काम नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, खडकवासला धरणातून सोडण्यात येणारे पाणी नवीन मुठा उजव्या कालव्याद्वारे पुणे शहरातून सुमारे ३४ किलोमीटर अंतर उघड्या स्वरूपात वाहून नेले जाते. शहरातील वाढते नागरीकरण, कालव्यालगतची अतिक्रमणे, पाणीचोरी, गळती आणि कचऱ्यामुळे या कालव्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे. १९९१ पासून या कालव्याला सहा वेळा भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणावर पाण्याचे नुकसान झाले आहे. अशा दुर्घटनांमुळे शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर उघड्या कालव्याऐवजी भूमिगत बोगद्यातून पाणी वाहून नेण्याचा पर्याय पुढे आला होता. या प्रकल्पासाठी ५ सप्टेंबर २०२४ रोजी राज्य शासनाने २ हजार १९० कोटी ४७ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली. दौंडचे आमदार राहुल कुल यांनी २०२० पासून विधानसभेत कपात सूचना, तारांकित प्रश्न, अर्धा तास चर्चा आणि लक्षवेधी सूचनांच्या माध्यमातून या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला होता. आता प्रत्यक्ष कामाला गती मिळाल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नाबाबत अपेक्षा वाढल्या आहेत.

असा आहे भूमिगत प्रकल्प….

खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान सुमारे २४.२ किलोमीटर लांबीचा मुख्य भूमिगत बोगदा तयार करण्यात येत आहे. कट अँड कव्हर पद्धतीने होणारे काम आणि खुल्या कालव्याच्या भागासह प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे २६.७ किलोमीटर आहे. बोगद्याचा व्यास ६.३ मीटर असून, त्याचा आकार हॉर्स-शू पद्धतीचा आहे. ड्रिल अँड ब्लास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून खडक फोडत खोदकाम केले जात आहे. २९ ऑगस्ट २०२५ पासून कोल्हेवाडी, धायरी, वडाचीवाडी, उरुळी देवाची आणि वडकी अशा पाच ठिकाणांहून एकाच वेळी बोगद्याचे काम सुरू करण्यात आले. आतापर्यंत सुमारे सहा किलोमीटर खोदकाम पूर्ण झाल्याची माहिती पाहणीवेळी देण्यात आली. उर्वरित कामही नियोजनानुसार पूर्ण करण्याचे आव्हान यंत्रणेसमोर आहे.

दौंड, बारामती, इंदापूरच्या शेतीला काय फायदा?

या बोगद्यामुळे दरवर्षी सुमारे २.१८ टीएमसी पाण्याची बचत अपेक्षित आहे. त्यापैकी १.१८ टीएमसी पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार असून, दौंड, इंदापूर, हवेली आणि बारामती तालुक्यांतील सिंचनापासून वंचित राहिलेल्या ३ हजार ४७१ हेक्टर क्षेत्राला त्याचा लाभ मिळणार आहे. उर्वरित सुमारे एक टीएमसी पाणी पुणे शहराच्या पिण्याच्या आणि बिगर सिंचनाच्या वाढत्या गरजांसाठी उपलब्ध होईल.bविशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या आणि सिंचनाची मर्यादित सुविधा असलेल्या दौंड व इंदापूर तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. मात्र, बचत होणाऱ्या पाण्याचे प्रत्यक्ष वाटप, तालुकानिहाय उपलब्धता आणि सिंचन क्षेत्रापर्यंत पाणी पोहोचविण्याची व्यवस्था याकडेही आगामी काळात लक्ष राहणार आहे. बोगदा पूर्ण झाल्यानंतर पुणे शहरातील खुल्या कालव्यामुळे होणारे जलप्रदूषण, पाणीगळती आणि कालवा फुटीचा धोका कमी होणार आहे. कालव्याच्या देखभालीवरील खर्चातही बचत होईल. तसेच शहरातील कालव्याची जागा रस्ते आणि अन्य सार्वजनिक सुविधांसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

6 kilometers of work on the Khadakwasla-Fursungi tunnel completed; Daund, Indapur, and Baramati to get relief

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात