विशेष प्रतिनिधी
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय घडामोडींना वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते उमेश पाटील यांनी केला आहे. उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची तीन आमदारांनी घेतलेली भेट म्हणजे पार्थ पवार यांनी बैठक बोलावल्याचे चित्र काही रंगवले जात आहे. प्रत्यक्षात या दोन पूर्णतः वेगळ्या बाबी असून, त्यांची सरमिसळ करून जाणीवपूर्वक नकारात्मक राजकीय नॅरेटिव्ह तयार केले जात असल्याचे उमेश पाटील यांनी एक्सवरील पोस्टमधून म्हटले आहे.
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शंकर मांडेकर, माऊली कटके आणि चेतन तुपे यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडी आणि विलनिकरणाच्या हालचालींच्या अनुषंगाने या भेटीकडे पाहिले जाऊ लागले होते. त्यातच या भेटीचा संबंध खासदार पार्थ पवार यांनी बैठक बोलावल्याच्या चर्चेशी जोडण्यात आल्याने राजकीय संभ्रम निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर उमेश पाटील यांनी सोशल मीडियावर भूमिका स्पष्ट केली.
आमदारांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेणे ही एक बाब आहे, तर पार्थदादांनी बैठक बोलावणे ही पूर्णपणे वेगळी बाब आहे. या दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध जोडणे चुकीचे आहे. वस्तुस्थितीचा विपर्यास करून नकारात्मक राजकीय वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आक्षेप त्यांनी नोंदवला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आलेला असताना या भेटीगाठींना विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रत्येक हालचालीचा वेगवेगळा अर्थ लावला जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App