दादांच्या चितेला अग्नीही दिला नव्हता, तेव्हा बारामतीच्या हॉटेलमध्ये बसून तटकरे आमदारांना फोडत होते!; राष्ट्रवादी हायजॅक करण्याचा डाव; महेंद्र थोरवेंचा गौप्यस्फोट

विशेष प्रतिनिधी

मुंबई / रायगड: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांवरून राज्याच्या राजकारणात दररोज नवे भूकंप होत असतानाच, आता शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत गंभीर, स्फोटक आणि खळबळजनक आरोप केले आहेत. “27 जानेवारी रोजी अजित दादांचे अपघाती निधन झाले, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल होता. अजित दादांच्या चितेला साधा अग्नीही दिला गेला नव्हता; त्यावेळी सुनील तटकरे 27 आणि 28 तारखेला बारामतीच्या एका हॉटेलमध्ये थांबून राष्ट्रवादीच्या आमदारांना स्वतःकडे येण्यासाठी गुप्त फोन करत होते. प्रदेशाध्यक्ष म्हणून उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखाते स्वतःकडे घेऊन संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष हायजॅक करण्याचा त्यांचा कपटी डाव होता,” असा थेट राजकीय ‘ॲटमबॉम्ब’ महेंद्र थोरवे यांनी फोडला आहे.

इतकेच नव्हे तर, “सुनेत्रा वहिनींवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही त्या अत्यंत सतर्क होत्या आणि त्यांनी तिसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, म्हणूनच तटकरेंचा पक्ष ताब्यात घेण्याचा डाव फसला,” असा मोठा गौप्यस्फोटही थोरवे यांनी केला आहे.

तटकरेंनी पक्ष हायजॅक केला असता -महेंद्र थोरवे

माध्यमांशी संवाद साधताना आमदार महेंद्र थोरवे यांनी सुनील तटकरे यांच्यावर अक्षरशः हल्लाबोल चढवला आणि संपूर्ण घटनाक्रमच जगासमोर मांडला. “27 जानेवारीला अजित दादांचे अपघाती निधन झाले. हे दुःख आम्हा सर्वांना प्रचंड होते. परंतु सुनील तटकरे 27 आणि 28 तारखेला बारामतीच्या एका हॉटेलमध्ये थांबलेले होते. दादांच्या चितेला अग्नीही दिलेला नव्हता, अशा वेळी हा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादीच्या आमदारांना आपल्याबरोबर येण्यासाठी फोन करत होता. तुम्ही मीडियाच्या माध्यमातून याचे पुरावे तपासून पाहा.”

“प्रदेशाध्यक्ष या नात्याने उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थखाते आपल्या ताब्यात कसे राहील व संपूर्ण पक्ष कसा हायजॅक करता येईल, यासाठी तटकरेंचा त्या दिवशी खटाटोप सुरू होता.”

“एवढा मोठा दुःखाचा डोंगर डोक्यावर असतानाही सुनेत्रा वहिनी अत्यंत अलर्ट होत्या. त्यांनी तिसऱ्या दिवशी शपथविधी घेतला, त्यामागचे एकमेव कारण हेच होते की तटकरेंना हा पक्ष हायजॅक करू द्यायचा नव्हता. त्यांच्या त्या धाडसी आणि समयसूचक निर्णयामुळेच हा कट टळला.”



विलीनीकरणाच्या 13 बैठका झाल्या

सुनील तटकरे यांनी अलीकडेच ‘अजित दादा हयात असते तर 12 फेब्रुवारीला विलीनीकरण झाले असते’ असे विधान केले होते. त्यावर थोरवेंनी तटकरेंच्या दाव्याची पोलखोल केली.

“माझ्या माहितीप्रमाणे अजित दादा हयात असताना शरद पवार साहेब आणि त्यांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत विलीनीकरणाच्या तब्बल 13 वेळा बैठका झाल्या होत्या. पण प्रदेशाध्यक्ष असूनही या एकाही बैठकीला अजित दादांनी आपला विश्वासू साथीदार म्हणून सुनील तटकरेंना सोबत नेले नव्हते; कारण दादांचा तटकरेंवर विश्वासच नव्हता.”

घातपातावर मौन अन् आता अर्थखात्यासाठी यु-टर्न

“सुनील तटकरे हा अत्यंत कपटी, धूर्त आणि खोटारडा माणूस आहे. अजित दादा गेल्यानंतर त्यांच्या अपघाताच्या किंवा घातपाताच्या मुद्द्यावर तटकरे आजवर चकार शब्दही बोललेले नाहीत. आणि आता अचानक यु-टर्न घेऊन ‘दादांनी मला विलीनीकरणाबाबत सांगितले होते’ असे धादांत खोटे बोलत आहेत. हे सगळे केवळ अर्थखाते स्वतःकडे मिळावे, या स्वार्थासाठीच सुरू आहे,” असा घणाघात थोरवे यांनी केला.

रायगडमधील जुन्या वादाची किनार; तटकरेंच्या प्रत्युत्तराकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

रायगड जिल्ह्याच्या राजकारणात खासदार सुनील तटकरे आणि शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे व मंत्री भरत गोगावले यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. मात्र, थोरवे यांनी थेट अजित पवारांच्या निधनाच्या दिवसाचा, बारामतीतील हॉटेलमधील घडामोडींचा आणि सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा संदर्भ देत तटकरेंवर ‘पक्ष हायजॅक’ करण्याचा आरोप केल्यामुळे महायुतीमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आता थोरवे यांच्या या गंभीर आणि थेट आरोपांना खासदार सुनील तटकरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट काय प्रत्युत्तर देतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Mahendra Thorve Alleges Sunil Tatkare Tried to Take Over NCP After Ajit Pawar’s Death

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात