‘गोकुळ’ डी. वाय. पाटील दूध संघ होण्यापासून ठरावधारकांनी वाचवला; सतेज पाटील फेक नरेटिव्ह सेट करण्यात तरबेज, धनंजय महाडिकांचा पलटवार

Dhananjay Mahadik

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’मधील शासननियुक्त तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीवरून कोल्हापूरचे राजकारण चांगलेच तापले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात विरोधकांनी काढलेल्या मोर्चाला प्रत्युत्तर देताना खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. “सतेज पाटील हे फेक नरेटिव्ह सेट करण्यात तरबेज आहेत. बहुमत असल्याचा दावा केला जात असला तरी गोकुळमध्ये कोरम पूर्ण करण्यासाठी अद्याप 1 जागा कमीच आहे. माजी पालकमंत्र्यांचा इतिहास आणि त्यांचा उन्माद कोल्हापूरकरांना चांगलाच माहीत आहे; त्यामुळे त्यांच्या उद्याच्या मोर्चाला नेमके किती लोक जमतात हे पाहूच,” अशा शब्दांत महाडिक यांनी पाटील यांना ललकारले आहे.

तसेच, गोकुळवर ताबा मिळवण्याचा सरकारचा कोणताही हेतू नसून तज्ज्ञ संचालक नेमण्याचा सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

ठरावधारकांनी वाचवले -महाडिक

गोकुळच्या मालकी हक्कावरून आणि सहकारी संस्थांच्या कारभारावरून धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांना थेट आरसा दाखवला. “गोकुळ दूध संघाचे नाव बदलून तो ‘डी. वाय. पाटील दूध संघ’ होण्यापासून सूज्ञ ठरावधारकांनी वाचवला आहे. संबंधितांनी यापूर्वी सहकारी साखर कारखान्याचे नेमके काय केले, हे संपूर्ण कोल्हापूरला माहिती आहे.”

5 वर्षांपूर्वीच्या धमक्यांचा पाढा

5 वर्षांपूर्वी झालेल्या गोकुळच्या निवडणुकीचा संदर्भ देत महाडिक म्हणाले, “त्या निवडणुकीत मतदान न करणाऱ्या ठरावधारकांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली होती. त्यांना बघून घेण्याच्या धमक्या दिल्या गेल्यामुळे अनेक संचालक आणि ठरावधारक प्रचंड नाराज झाले होते.”

सत्ता वाटून घेण्याचा प्रस्ताव दिला असता तर विचार केला असता

गोकुळमधील सत्तापेचावर बोलताना महाडिक यांनी सतेज पाटील यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “गोकुळमध्ये सत्ता वाटून घेण्याबाबत किंवा एकत्रितपणे कारभार करण्याबाबत सकारात्मक प्रस्ताव आला असता, तर आम्ही त्यावर निश्चित विचार केला असता. अध्यक्षपदाची जबाबदारी काही वर्षे एका गटाकडे आणि उर्वरित काळ दुसऱ्या गटाकडे देण्याबाबत चर्चा झाली असती तरी मार्ग निघाला असता. पण तसा कोणताही प्रस्ताव न देता केवळ तांत्रिक मुद्द्यांवरून आम्हाला अडवले जात आहे.”

संपूर्ण महाराष्ट्रात चुकीचा संदेश

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमच्या सर्वांचीच समन्वयाची भूमिका होती. आम्ही विरोधात बसणार असल्याचेही आधीच स्पष्ट केले होते. असे असतानाही सतेज पाटील संपूर्ण महाराष्ट्रात चुकीचा संदेश पसरवून फेक नरेटिव्ह तयार करत आहेत.”



शासकीय संचालक पूर्णपणे अराजकीय असतील

तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्तीबाबत निर्माण केला जाणारा संभ्रम महाडिक यांनी दूर केला. “गोकुळवर नेमका कोणत्या गटाचा अध्यक्ष होईल—महायुतीचा की समविचारी आघाडीचा—हे आताच सांगता येणार नाही. मात्र, शासननियुक्त तज्ज्ञ संचालक हे पूर्णपणे अराजकीय असतील. तसेच निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांपैकी कोणालाही शासकीय संचालक म्हणून नियुक्त केले जाणार नाही.”

शेतकऱ्यांच्या हितालाच प्राधान्य

“सरकारला गोकुळवर कब्जा करण्याची कोणतीही गरज नाही. उलट गोकुळचा कारभार सुरळीत चालावा आणि हा संघ अधिक नावारूपाला यावा, यासाठी महाराष्ट्र सरकार गोकुळच्या पाठीशी ठामपणे उभे आहे.”

दिवाळीत मोर्चा काढून व्यापाऱ्यांना वेठीस धरू नका

विरोधकांच्या आंदोलनाच्या वेळेवरही महाडिक यांनी तीव्र आक्षेप घेतला. “सध्या दिवाळीचा सण सुरू असताना मोर्चे आणि आंदोलने काढून व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर व बाजारपेठेतील व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो. राजकीय आंदोलन करताना सामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.”

गर्दीच्या दाव्यांची खिल्ली

“यापूर्वी राहुल गांधी यांनी दिल्लीत मोठ्या संख्येने लोक जमवण्याची घोषणा केली होती; त्याचप्रमाणे कोल्हापुरातही लाखोंच्या संख्येने लोक एकत्र आणण्याचे दावे केले जात आहेत. मात्र, उद्याच्या मोर्चाला प्रत्यक्षात किती लोक उपस्थित राहतात, याबाबत मला मोठी शंका आहे,” असा टोला महाडिक यांनी लगावला.

Dhananjay Mahadik Hits Back at Satej Patil Over Gokul Dairy Union Controversy

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात