विशेष प्रतिनिधी
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा धुरळा उडवून दिला आहे. खासदार सुनील तटकरे यांनी “अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादींचे विलीनीकरण झाले असते,” असा खळबळजनक दावा केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तटकरेंचा अक्षरशः पंचनामा केला आहे.
“अजितदादा हयात असतानाच सत्तेतून बाहेर पडून दोन्ही पक्षांनी एकत्र यावे असे ठरले होते. यासंदर्भात जयंत पाटील यांच्या घरी आणि बारामतीत खुद्द दादांच्या उपस्थितीत बैठकाही झाल्या होत्या; पण दादांच्या दुर्दैवी निधनानंतर तटकरेंनी ‘अशी कोणतीही चर्चा झालीच नाही’ असे सांगत सपशेल नकार दिला होता. मग आज अचानक 2 वर्षांनंतर घुमजाव करत तटकरे विलीनीकरणाची भाषा का करत आहेत? त्यावेळी कोणाच्या दबावाखाली तटकरे खोटे बोलत होते आणि दोन्ही पक्ष एकत्र येण्याचे कोणी रोखले, याचे उत्तर त्यांनी महाराष्ट्राला द्यावे,” असा थेट घणाघात देशमुख यांनी केला आहे.
माध्यमांशी संवाद साधताना अनिल देशमुख यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाचा संपूर्ण घटनाक्रमच जगासमोर मांडला आणि आजच्या घडीला एकत्र येण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे ठामपणे स्पष्ट केले.
जयंत पाटलांचे घर ते बारामती; दादांच्या उपस्थितीत काय ठरले होते?
सुनील तटकरे यांच्या दाव्याची पोलखोल करताना अनिल देशमुख यांनी बैठकांचा तपशील दिला. “अजितदादा हयात असताना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि अजित दादांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी सत्तेतून बाहेर पडून पुन्हा एकत्र यावे, हे पूर्णपणे ठरले होते. ही चर्चा काही गुपित नव्हती.”
प्रांताध्यक्षपदापर्यंत चर्चा पूर्ण
“या एकत्रीकरणासाठी जयंत पाटील यांच्या निवासस्थानी बैठक झाली होती. त्यात एकत्र आल्यानंतर प्रांताध्यक्ष कोणाकडे द्यायचे आणि कोणाची काय जबाबदारी असेल, यावरही सविस्तर चर्चा झाली होती. त्यानंतर शेवटची निर्णायक बैठक बारामती येथे झाली, जिथे स्वतः अजित दादा आणि आमचे सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते.”
तटकरेंचे घुमजाव संशयास्पद
“दादांच्या अपघाती निधनानंतर सुनील तटकरे यांनी मीडियासमोर क्लिपिंग देऊन सांगितले होते की, बारामतीच्या बैठकीत विलीनीकरणाचा विषयच नव्हता, आम्हाला दादांनी काहीच सांगितले नव्हते. मग आज 2 वर्षांनंतर तटकरेंना उपरती कशी झाली? दोन वर्षांपूर्वी त्यांच्यावर कोणाचा दबाव होता ज्यामुळे त्यांनी दोन्ही पक्ष एकत्र येऊ दिले नाहीत, हे त्यांनीच स्पष्ट करावे.”
विलीनीकरणाची चर्चा शून्य; पण चांगल्या नेत्यांसाठी पक्षात इनकमिंगचे दरवाजे खुले!
शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या रुग्णालयातील भेटीनंतर सुरू झालेल्या विलीनीकरणाच्या अफवांना देशमुख यांनी पूर्णविराम दिला. “प्रफुल्ल पटेल हे शरद पवार साहेबांची प्रकृती बरी नसल्याने रुग्णालयात विचारपूस करायला गेले असतील; आजारपणात भेटणे ही आपली संस्कृती आहे. मात्र आजच्या घडीला दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाची कोणतीही चर्चा सुरू नाही. 15 दिवसांपूर्वीच मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटर येथे झालेल्या बैठकीत शरद पवार साहेबांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की, विलीनीकरणाचा कोणताही विषय नाही, आपला पक्ष मजबूत करा.”
वैयक्तिक प्रवेशास स्वागतच
“पवार साहेबांनी हेही स्पष्ट केले आहे की, आमच्या पक्षात जर कोणाला वैयक्तिकरीत्या प्रवेश करायचा असेल, तर त्या चांगल्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि जनतेत प्रतिमा चांगली असलेल्या नेत्यांचे पक्षात नक्कीच स्वागत आहे. बाहेर गेलेले सर्व लोक परत आले तरी त्यांचे स्वागतच राहील; पण पक्षाचे विलीनीकरण होणार नाही.”
पंतप्रधान मोदींच्या फोनचा वेगळा राजकीय अर्थ काढू नका!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना फोन करून प्रकृतीची विचारपूस केल्यानंतर सुरू झालेल्या चर्चांवर बोलताना देशमुख म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करताना काही वेगळ्या सद्भावनेने विधान केले असेल. त्याचे भलते राजकीय अर्थ काढण्याची किंवा त्याचा संबंध विलीनीकरणाशी जोडण्याची अजिबात गरज नाही,” असे स्पष्ट करत देशमुख यांनी या चर्चांवर पडदा टाकला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App