विशेष प्रतिनिधी
पुणे : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजनसृष्टीसह त्यांच्या असंख्य चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. आपल्या दमदार अभिनयासोबतच परखड स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाणारे नाना पाटेकर मृत्यूबाबतही तितक्याच बेधडकपणे बोलत असत. त्यांच्या निधनानंतर नाना पाटेकर यांचा मृत्यू आणि अंत्यसंस्काराबाबतचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये नाना यांनी आपल्या अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या लाकडांचीही आधीच व्यवस्था केल्याचे सांगितले होते.
नाना पाटेकर यांच्याशी संबंधित या आठवणी सांगताना नाम फाउंडेशनचे सीईओ गणेश थोरात भावुक झाले. नानांनी आपले काही झाले तरी अंत्यविधी आपल्या शेतातच करावेत, अशी इच्छा व्यक्त करून ठेवली होती, असे त्यांनी सांगितले. “मला त्या मातीत राहू द्या, मला त्याच मातीत मिसळा,” अशी नानांची भावना होती, असे थोरात यांनी सांगितले.
अंत्यविधीसाठी लाकडंही आधीच काढून ठेवली होती
गणेश थोरात यांनी सांगितल्यानुसार, नाना पाटेकर यांनी स्वतःच्या शेतात वाढलेली झाडांची लाकडं अंत्यसंस्कारासाठी वापरण्याची इच्छा व्यक्त केली होती. एवढेच नव्हे तर अंत्यविधीसाठी लागणारी लाकडं त्यांनी आधीच काढून एका बाजूला ठेवली होती. आपल्या शेतातच अंत्यविधी व्हावा, अशी त्यांची इच्छा होती.
“माझे अंत्यविधी माझ्या शेतातच करा. माझ्या शेतात मोठी झालेली लाकडंच माझ्या अंत्यविधीसाठी वापरा आणि माझ्याच शेतात माझे अंत्यविधी झाले पाहिजेत,” असे नानांनी सांगून ठेवले होते, अशी माहिती गणेश थोरात यांनी दिली.
“12 मण लाकडं लागणार आहेत…”
दरम्यान, नाना पाटेकर यांच्या जुन्या मुलाखतीतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये नाना आपल्या मृत्यूबाबत अतिशय सहज आणि मिश्कील शैलीत बोलताना दिसतात. “मला माहिती आहे, कधी ना कधी मला जायचंय. त्यासाठी 12 मण लाकडं लागणार आहेत. तेवढीच लागणार आहेत,” असे नाना या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसतात.
पुढे ते आपल्या सरणासाठी लागणारी लाकडं आपण जमा करून ठेवली असल्याचे सांगतात. ही लाकडं सुकलेली असावीत, अशीही त्यांची इच्छा होती. ओली लाकडं वापरल्यास धूर होईल आणि अंत्यविधीला आलेल्या लोकांच्या डोळ्यांत पाणी येईल, अशी नानांची मिश्कील टिप्पणी या व्हिडीओमध्ये ऐकायला मिळते.
“माझ्या मृत्यूनंतर गैरसमज नकोत…”
नाना पाटेकरांच्या या वक्तव्यात त्यांच्या नेहमीच्या मिश्कील आणि परखड शैलीची झलक पाहायला मिळते. अंत्यविधीच्या वेळी उपस्थित असलेल्या लोकांच्या डोळ्यांत धूर गेल्यामुळे पाणी आले, तर ते माझ्यासाठी रडत आहेत, असा गैरसमज होईल, असे नाना विनोदी शैलीत सांगतात.
“मित्र-मंडळी, शेजारी-पाजारी सगळेच जमा होतील. त्यांच्या डोळ्यांत धूर जाईल, पाणी येईल त्यांच्या डोळ्यांतून आणि माझ्या मृत्यूनंतर गैरसमज होईल की हे सगळे माझ्यासाठीच रडत आहेत. कमीत कमी मी मेल्यानंतर तरी गैरसमज नकोत,” असे नाना म्हणाले होते.
नाना पाटेकर यांच्या निधनानंतर हा जुना व्हिडीओ पुन्हा समोर आल्याने त्यांच्या चाहत्यांच्या भावनांना मोठा धक्का बसला आहे. आयुष्यभर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या नानांनी मृत्यूबाबतही कोणताही आडपडदा न ठेवता व्यक्त केलेले विचार आता त्यांच्या चाहत्यांच्या स्मरणात राहणार आहेत.
नाना पाटेकर यांच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीने एक अष्टपैलू आणि प्रभावी कलाकार गमावला आहे. त्यांच्या अभिनयाची शैली, संवादफेक आणि सामाजिक कामाची बांधिलकी यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण असल्याची भावना त्यांच्या चाहत्यांकडून व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App