विशेष प्रतिनिधी
नागपूर : शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या अनुपस्थितीवरून भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी गंभीर आरोप केले आहेत. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा करत, ते देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचा आरोप राणे यांनी केला. ठाकरे बंधूंच्या मोर्चात आदित्य ठाकरे अनुपस्थित असल्याने राणे यांनी त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणे म्हणाले की, दिशा सालियान प्रकरणाच्या एफआयआरमध्ये आदित्य ठाकरे यांचे नाव अनेक वेळा आल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणात डिनो मोरिया याला अटक झाल्याचेही त्यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे देश सोडून जाऊ शकतात, असा आरोप राणे यांनी केला.
“इतर मोठे आर्थिक गुन्हेगार ज्या पद्धतीने देश सोडून पळून गेले, त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेही देश सोडून जाऊ शकतात. त्यामुळे ते मातोश्रीवर आहेत की देश सोडून गेले आहेत, याची पोलिसांनी तपासणी करावी. त्यांचा पासपोर्ट तत्काळ जप्त करून लूकआउट नोटीस काढावी,” अशी मागणी नितेश राणे यांनी केली.
ठाकरे बंधूंच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी झाले नसल्याबद्दलही राणे यांनी प्रश्न उपस्थित केले. आदित्य ठाकरे यांना ताप असल्याचे कारण सांगण्यात आले असले, तरी गंभीर प्रकरणांच्या चौकशीमुळे अटकेच्या भीतीने ते लपून बसले आहेत किंवा देश सोडण्याच्या तयारीत आहेत, असा दावा राणे यांनी केला.
‘भाजप कधीच सोडणार नाही’
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विधानावरही नितेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली. “रोहित पवार मंत्रिमंडळात आले तर नितेश राणे भाजपमध्ये नसतील,” असे विधान रोहित पवार यांनी केल्याचा संदर्भ देत राणे म्हणाले की, रोहित पवार यांनी उगाच इकडे-तिकडे उत्तरे देण्यापेक्षा तारीख आणि वेळ स्पष्ट करावी.
“मी भाजप कधीही सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत भाजपमध्येच राहणार आहे. उद्या सत्तेत आल्यावर आणि मंत्री झाल्यावर त्यांनाही समजेल की घटनात्मक पदावरील अध्यक्षांना हटवण्यासाठी कोणती कायदेशीर प्रक्रिया करावी लागते,” असे राणे म्हणाले.
विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्यापेक्षा त्यांना योग्य दिशा देण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
विनापरवानगी मोर्चावर कारवाई होणारच
ठाकरे बंधूंच्या मोर्चावर गुन्हा दाखल झाल्याबाबत विचारले असता नितेश राणे यांनी आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना असल्याचे मान्य केले. मात्र, विनापरवानगी मोर्चा काढल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
“हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानुसार चालतो. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, विनापरवानगी मोर्चे काढले तर कायदेशीर कारवाई होणारच. ठाकरे स्वतः पुढे येत नाहीत; मात्र विनापरवानगी मोर्चाचे नियोजन करणाऱ्या आयोजकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांनी आता न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे,” असे राणे म्हणाले.
अभिजीत दिपके यांच्यावरही राणेंची टीका
पुणे बंदची हाक देणाऱ्या सीजेपी आणि अभिजीत दिपके यांच्यावरही नितेश राणे यांनी टीका केली. “अभिजीत दिपके हा केवळ एक मुखवटा असून त्याच्या मागे उमर खालिदची विचारसरणी आहे,” असा आरोप त्यांनी केला.
देशात अराजकता निर्माण करणे ही पाकिस्तानची भूमिका असल्याचे सांगत, काही लोक त्याच भाषेत बोलत असल्याचा आरोप राणे यांनी केला. एसआयआर रद्द करा आणि निवडणुकांवर बहिष्कार टाका, अशी भूमिका घेतली जात असल्याचे ते म्हणाले.
बोगस मतदार तसेच रोहिंग्या आणि घुसखोरांची नावे मतदारयादीतून वगळली जात असल्यामुळे ‘व्होट जिहाद’ उघड होत असल्याचा दावाही राणे यांनी केला.
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्यांवरही भाष्य
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरही नितेश राणे यांनी भूमिका मांडली. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या १३ प्रमुख मागण्यांपैकी १२ मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच पूर्ण केल्याचा दावा त्यांनी केला.
एमपीएससी अध्यक्षांचे पद घटनात्मक स्वरूपाचे असल्याने त्यांना हटवण्यासाठी ठरावीक कायदेशीर प्रक्रिया असल्याचे राणे म्हणाले. एमपीएससीच्या सचिवांची तत्काळ बदली करण्यात आली असून व्ही. राधा आणि रामास्वामी यांच्या सक्षम समितीमार्फत संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App