विशेष प्रतिनिधी
मुंबई : माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत ‘सेवा मेरा योगदान’ या उपक्रमाच्या माध्यमातून ‘डायबेटिस फ्री मुंबई’ चा संकल्प मुंबई भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत २२ सप्टेंबर रोजी संपूर्ण मुंबईत विविध ठिकाणी ब्लड शुगर तसेच रक्तदाब तपासणीसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
मुंबईकरांनी आपल्या घराजवळ आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य तपासणी शिबिरांचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष, आमदार अमीत साटम यांनी केले आहे. Amit Satam
मधुमेह आणि उच्च रक्तदाब हे जीवनशैलीशी संबंधित आजार असून, सुरुवातीच्या टप्प्यात अनेकदा त्यांची ठळक लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे वेळोवेळी रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब तपासून घेणे महत्त्वाचे आहे. नागरिकांना त्यांच्या परिसरातच ही प्राथमिक तपासणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मुंबईतील विविध भागांमध्ये या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
निरोगी मुंबई ही सक्षम मुंबईची ओळख आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाबासारख्या आजारांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि त्यांना प्राथमिक आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देणे, हा सेवा मेरा योगदान उपक्रमामागील उद्देश आहे असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या माध्यमातून मुंबईतील नागरिकांमध्ये आरोग्य तपासणी, आजारांविषयी जागरूकता आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वतः तपासणी करून घेण्यासोबतच आपल्या कुटुंबीय, मित्र आणि परिसरातील नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन मुंबई भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
सेवा मेरा योगदानच्या माध्यमातून निरोगी, जागरूक आणि मधुमेहमुक्त मुंबईच्या दिशेने एक सामूहिक पाऊल टाकूया, असे आवाहन मुंबई भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App