अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार होती ; विलीनीकरणाच्या चर्चा थांबल्या युगेंद्र पवार यांचा खुलासा

विशेष प्रतिनिधी

बारामती : अजितदादा हयात असतानाची आणि सध्याची राजकीय परिस्थिती यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा सुरू होत्या. दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार होती. मात्र आता या चर्चा थांबल्या असून, वरिष्ठ पातळीवर काही घडामोडी सुरू असल्यास त्याची माहिती आपल्याला नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले.

बारामती येथील एका हॉटेलमध्ये बुधवारी (ता. १६) सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत युगेंद्र पवार बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असताना संपूर्ण पक्षाचे नेतृत्व अजितदादांकडे जाणार असल्याचे चित्र होते. मात्र आता परिस्थिती बदलली आहे.

विलीनीकरणावर बोलण्यासाठी आपण खूप छोटा कार्यकर्ता आहोत. सध्या तरी या चर्चा थांबल्या असून, वरिष्ठ पातळीवर काही चर्चा सुरू असल्यास त्याची माहिती नाही, असे युगेंद्र पवार यांनी सांगितले. माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीवेळी आमचे उमेदवार घेण्याचे सांगण्यात आले होते. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे शेवटच्या क्षणी पॅनल उभे करावे लागले. सोमेश्वर कारखाना निवडणुकीसाठी मात्र सुरुवातीपासूनच स्वतंत्र पॅनल देऊन निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची भावना आहे. त्यानुसार तयारी सुरू असल्याचे युगेंद्र पवार यांनी स्पष्ट केले. या निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांचे सहकार्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची कारखाना कार्यक्षेत्रात प्रचार सभा घेण्यासाठी विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी झालेल्या मुलाखतींना कारखाना कार्यक्षेत्रातील विविध गटांमधील सुमारे १३० ते १४० इच्छुक उमेदवार उपस्थित होते. सध्या कोणत्याही पक्षाकडून युती अथवा आघाडीचा प्रस्ताव आलेला नाही. भविष्यात असा प्रस्ताव आल्यास त्यावर विचार केला जाईल. मात्र सध्यातरी स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय कायम आहे. निवडणुकीला अद्याप बराच कालावधी असून, या काळात काय घडते ते पाहू, असे युगेंद्र पवार म्हणाले.

Merger talks have stopped: Yugendra Pawar clarifies.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात