एसटीच्या १२५ बसस्थानकांवर उभारणार ‘हिरकणी कक्ष’; स्तनदा मातांसाठी सुरक्षित आणि खासगी सुविधा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील महिला प्रवाशांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सन्मानाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडच्या सहकार्याने राज्यभरातील एसटी बसस्थानकांवर १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत यासंदर्भात एसटी महामंडळ आणि टोयोटा किर्लोस्कर मोटर यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक उपस्थित होते.

स्तनदा मातांसाठी सुरक्षित आणि खासगी जागा

महिलांना, विशेषतः स्तनदा मातांना, प्रवासादरम्यान बाळाची काळजी घेता यावी, यासाठी स्वच्छ, सुरक्षित आणि खासगी जागा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात येणार आहेत. या सुविधेमुळे बसस्थानकांवर मातांना स्तनपान तसेच बाळाची निगा राखण्यासाठी आवश्यक वातावरण मिळणार आहे.

टोयोटाच्या सीएसआर निधीतून प्रकल्प

टोयोटा किर्लोस्कर मोटर कंपनी आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत या प्रकल्पासाठी सहकार्य करणार आहे. करारानुसार एसटी बसस्थानकांवर अंदाजे ३ मीटर × ३ मीटर आकाराचे प्री-फॅब्रिकेटेड कक्ष उभारले जातील.

या कक्षांमध्ये आवश्यक फर्निचर, फिक्स्चर, अंतर्गत वायरिंग, विद्युतीकरण आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य यांचा समावेश असेल. मातांना सुरक्षित आणि गोपनीय जागा मिळावी, यासाठी या सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.



तीन वर्षांत १२५ कक्ष उभारण्याचे नियोजन

सामंजस्य करारानुसार तीन आर्थिक वर्षांत एकूण १२५ ‘हिरकणी कक्ष’ उभारण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

२०२६-२७ : ५० कक्ष

२०२७-२८ : ५० कक्ष

२०२८-२९ : २५ कक्ष

सीएसआर धोरण, उपलब्ध जागा आणि स्थानिक गरजा लक्षात घेऊन कक्षांच्या संख्येत आवश्यकतेनुसार बदल करण्याची तरतूदही करारात करण्यात आली आहे.

कक्षांच्या देखभालीची जबाबदारी एसटीची

या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाकडून अंदाजे ५ मीटर × ५ मीटर जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच वीज, पाणी, स्थापनेसाठी सहकार्य आणि आवश्यक शासकीय परवानग्या मिळवून देण्याची जबाबदारी एसटीची राहणार आहे.

कक्षांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर आणि साहित्य महामंडळाकडे हस्तांतरित केल्यानंतर त्यांचे संचालन, सुरक्षा, दुरुस्ती, देखभाल आणि देखरेख करण्याची संपूर्ण जबाबदारी एसटी महामंडळाची असेल.

विशेष म्हणजे, या प्रकल्पासाठी एसटी महामंडळाकडून कोणतेही आर्थिक योगदान दिले जाणार नाही. संपूर्ण प्रकल्प टोयोटा किर्लोस्करच्या सीएसआर निधीतून राबविला जाणार आहे.

महिलांसाठी संवेदनशील सुविधा

एसटी ही महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाशी जोडलेली लोकवाहिनी आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या बसस्थानकांवर स्तनदा मातांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध झाल्याने महिला प्रवाशांच्या प्रवासाचा अनुभव अधिक सुसह्य होण्यास मदत होणार आहे.

‘हिरकणी कक्ष’ हा केवळ सुविधा प्रकल्प नसून मातृत्वाचा सन्मान, महिलांच्या गरजांची जाणीव आणि प्रवासी-केंद्रित एसटी व्यवस्थेच्या दिशेने उचललेले संवेदनशील पाऊल आहे, असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

‘Hirkani Rooms’ to be set up at 125 ST bus stations.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात