विशेष प्रतिनिधी
नागपूर : राज्यभरातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत असतानाच विदर्भातील बळीराजाची चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. पुढील १५ दिवस विदर्भात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता अत्यल्प असल्याचे नागपूर वेधशाळेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ पावसावर अवलंबून न राहता पिकांसाठी उपलब्ध पर्यायी सिंचन व्यवस्थांचा वापर करावा, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
नागपूर वेधशाळेचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांच्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र किंवा अन्य हवामान प्रणाली निर्माण झाल्यानंतर विदर्भात मान्सूनचा पाऊस सक्रिय होण्यास मदत होते. मात्र, आगामी काही दिवसांत अशी कोणतीही प्रणाली निर्माण होण्याची शक्यता दिसत नसल्याने विदर्भात व्यापक पावसाची शक्यता कमी आहे.
काही ठिकाणी स्थानिक हवामान बदलांमुळे तुरळक स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. मात्र, मुसळधार किंवा सलग व्यापक मान्सून पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यातच एल-निनोचा प्रभाव सक्रिय असल्याने सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, राज्यातील पावसाची परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मराठवाडा, विदर्भासह संपूर्ण राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याचा दावा त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.
जागतिक हवामान संस्थेने एल-निनोच्या प्रभावामुळे सप्टेंबर महिना कोरडा जाण्याचा अंदाज व्यक्त केला होता. हा अंदाज आता खरा ठरत असून, पावसाअभावी संपूर्ण हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्याचे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. बाधित शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, तसेच ग्रामीण भागातील शेतमजुरांना किमान २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
एकीकडे पावसाने दडी मारल्याने पिकांवर संकट ओढवले आहे, तर दुसरीकडे दुष्काळाचे सावट गडद होत आहे. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सरकार शेतकऱ्यांसाठी कोणता निर्णय घेते, याकडे राज्यातील शेतकरी आणि ग्रामीण भागाचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App