लॅबग्रोन डायमंड उद्योगात भारताने जागतिक नेतृत्व करावे; नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क

विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रयोगशाळेत विकसित होणाऱ्या हिऱ्यांच्या (लॅबग्रोन डायमंड) निर्मितीसाठी आवश्यक यंत्रसामग्रीपासून दागिन्यांचे उत्पादन, ब्रँडिंग, शोरूम आणि जागतिक विक्रीपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी भारतात उभारली जावी. या उदयोन्मुख क्षेत्रात भारतीय उद्योगाने जागतिक नेतृत्व प्रस्थापित करावे, असे आवाहन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी केले. lab-grown diamond

मुंबईत आयोजित ५२ व्या ‘इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’ सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, पणन मंत्री जयकुमार रावल, खासदार गोविंद ढोलकिया, आमदार अमित साटम आणि जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष किरीट भन्साळी यांच्यासह उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.

लॅबग्रोन डायमंडमध्ये मोठ्या संधी

अमित शाह म्हणाले की, भारताकडे पायाभूत सुविधा, ऊर्जा, भांडवल आणि उद्यमशील व्यापारी वर्गाचे मोठे सामर्थ्य आहे. आगामी काळात लॅबग्रोन डायमंडची जागतिक बाजारपेठ मोठ्या प्रमाणात विस्तारण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय उद्योगाने या संधीचा लाभ घेत उत्पादनाची क्षमता आणि व्यवसायाची व्याप्ती वाढवावी.

भारतीय कंपन्यांनी जागतिक दर्जाचे ब्रँड निर्माण करून प्रमुख आंतरराष्ट्रीय शहरांमध्ये विक्री केंद्रे उभारावीत. यासाठी केंद्र सरकार आवश्यक ते सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

रत्न व आभूषण उद्योगासाठी नवी मुंबईत मोठी जागा आणि आवश्यक एफएसआय उपलब्ध करून देण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. हा उद्योग महाराष्ट्राबाहेर जाऊ नये, यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहकार्य करेल, असेही शाह यांनी नमूद केले.

भारताची रत्न-आभूषण क्षेत्रात दीर्घ परंपरा

भारताला रत्न आणि आभूषण व्यापाराची हजारो वर्षांची परंपरा आहे. सुमारे सहा हजार वर्षांपूर्वीपासून भारतातून रत्ने आणि आभूषणांचा व्यापार होत असल्याचे शाह यांनी सांगितले. मध्ययुगीन काळात राजाश्रयामुळे जडजवाहीर आणि आभूषण कलेचा विकास झाला. कुंदन आणि मीनाकारीसारख्या कलांनी भारतीय आभूषणांना वेगळी ओळख मिळवून दिली.

जगभरात पैलू पाडल्या जाणाऱ्या प्रत्येक दहा हिऱ्यांपैकी सुमारे नऊ हिऱ्यांवर सुरतमध्ये प्रक्रिया केली जाते. सुरतच्या हिरे उद्योगाने लाखो नागरिकांना रोजगार दिला असून, देशाच्या अर्थव्यवस्था आणि निर्यातीत मोठे योगदान दिले आहे. मुंबईदेखील रत्न व आभूषण व्यापाराचे प्रमुख निर्यात केंद्र बनले आहे.

रत्न-आभूषण निर्यात २.४४ लाख कोटींवर

वर्ष २०२५ मध्ये भारताची रत्न व आभूषण निर्यात २ लाख ४४ हजार कोटी रुपयांवर पोहोचली. देशाच्या एकूण व्यापारी माल निर्यातीत या क्षेत्राचा वाटा सुमारे ६.३ टक्के आहे. या उद्योगातून सुमारे ७५ लाख नागरिकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळत असल्याचे शाह यांनी सांगितले.

अमेरिका, मध्यपूर्व, हाँगकाँग आणि युरोप या प्रमुख बाजारपेठांना भारत आभूषणांचा महत्त्वाचा पुरवठादार ठरला आहे. भारत जगातील ९० टक्क्यांहून अधिक कटिंग आणि पॉलिशिंग केलेल्या हिऱ्यांवर प्रक्रिया करतो, हे भारतीय कौशल्याचे उदाहरण असल्याचेही त्यांनी नमूद केले.

युरोपियन युनियन, संयुक्त अरब अमिराती, ऑस्ट्रेलिया, ओमान आणि ब्रिटनसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारांचा फायदा घेत उद्योगाने नव्या बाजारपेठा शोधाव्यात, असे आवाहन शाह यांनी केले.

नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क

नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक जेम्स अँड ज्वेलरी पार्कमुळे सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ५० हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

रत्न व आभूषण उद्योगाला आधुनिक पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि सुलभ दळणवळण उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. भारताच्या रत्न व आभूषण निर्यातीत मुंबई आणि महाराष्ट्राचा मोठा वाटा असून, भारत डायमंड बोर्समुळे या उद्योगाला सक्षम परिसंस्था मिळाली आहे.

नवी मुंबईतील जेम्स अँड ज्वेलरी पार्कसाठी राज्य सरकारने जागा उपलब्ध करून दिली असून, दसऱ्यापासून या प्रकल्पाचे काम सुरू होणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. देशातील अत्याधुनिक रत्न व आभूषण परिसंस्था या ठिकाणी उभारली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.



महाराष्ट्राचे स्वतंत्र रत्न-आभूषण धोरण

राज्य सरकारने २०२५ मध्ये रत्न व आभूषण क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण तयार केले आहे. पारंपरिक व्यवसायासोबतच लॅबग्रोन डायमंड उद्योगालाही या धोरणात प्रोत्साहन देण्यात आले आहे.

कर महसूल, परकीय चलन आणि मोठ्या प्रमाणातील रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने हा उद्योग महत्त्वाचा असून, त्याला आवश्यक ते सर्व सहकार्य राज्य सरकार करेल, असे फडणवीस यांनी सांगितले.

भारत डायमंड बोर्सला वाहतुकीची ‘अखंड जोडणी’

भारत डायमंड बोर्स परिसरातील वाढत्या उद्योग आणि रोजगाराच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुविधा मजबूत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मेट्रो स्थानकातून भारत डायमंड बोर्समध्ये थेट प्रवेश देण्याबरोबरच वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानकांवरून पॉड टॅक्सी सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आहे.

तसेच बुलेट ट्रेन स्थानकाला कोस्टल रोड, वांद्रे-वरळी सी लिंक, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल-२, कुर्ला परिसर आणि उत्तर कोस्टल रोडशी जोडण्यासाठी बोगद्यांद्वारे मार्गिका उभारण्याचे नियोजन आहे.

रेल्वे, मेट्रो, रस्ते आणि विमानतळ अशा सर्व वाहतूक सुविधांशी भारत डायमंड बोर्सची जोडणी करण्यावर भर दिला जाणार आहे.

रत्न-आभूषण उद्योगाचा अर्थव्यवस्थेत मोठा वाटा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, भारताच्या रत्न व आभूषण निर्यातीत महाराष्ट्राचा वाटा सुमारे ५० टक्के आहे. या उद्योगातून ५० लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले असून, सुमारे एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

भारताची अर्थव्यवस्था वेगाने प्रगती करत असून, विकसित भारत २०४७च्या संकल्पपूर्तीत रत्न व आभूषण उद्योगाची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे शिंदे यांनी नमूद केले.

२७ श्रेणींमध्ये ‘इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’

जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या वतीने आयोजित ५२ व्या ‘इंडिया जेम्स अँड ज्वेलरी अवॉर्ड्स’मध्ये विविध २७ श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले.

सर्वाधिक उलाढाल, रोजगारनिर्मिती, कर भरणारी कंपनी, कट अँड पॉलिश्ड डायमंड्स, मौल्यवान धातूंचे दागिने, चांदीचे दागिने, रंगीत रत्न, फॅशन ज्वेलरी, सिंथेटिक स्टोन्स आणि लॅबग्रोन डायमंड्स यांसह विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यात आला.

याशिवाय सामाजिकदृष्ट्या जबाबदार कंपनी, नाविन्यपूर्ण विपणन व ब्रँडिंग मोहीम, परदेशातील रत्न व आभूषण विक्री, महिला उद्योजक, उद्योगाला वित्तपुरवठा करणारी सर्वोत्तम बँक, जीवनगौरव आणि कर्मचारी पुरस्कार अशा विविध श्रेणींमध्येही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

India should assume global leadership in the lab-grown diamond industry; Gems and Jewellery Park in Navi Mumbai.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात