विशेष प्रतिनिधी
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात रिक्षाने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज, १ सप्टेंबरपासून रिक्षाच्या सुधारित भाडेवाढीची अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (RTO) मंजूर केलेल्या नव्या दरांनुसार आता प्रवाशांना पूर्वीपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.
नव्या दरानुसार, पहिल्या १.५ किलोमीटरसाठी किमान रिक्षाभाडे २५ रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले आहे. म्हणजेच किमान भाड्यात ५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतरच्या प्रत्येक किलोमीटरसाठी पूर्वी १७ रुपये आकारले जात होते. आता त्यासाठी २० रुपये प्रति किलोमीटर मोजावे लागणार आहेत.
डिजिटल मीटर अपडेट करणे बंधनकारक
नवीन भाडेवाढ लागू झाल्यानंतर रिक्षाचालकांना आपल्या वाहनातील डिजिटल मीटर कॅलिब्रेट करून घेणे आवश्यक आहे. मीटर अपडेट होईपर्यंत प्रवाशांकडून भाडे आकारताना रिक्षाचालकांना RTOचे अधिकृत भाडेपत्रक दाखवावे लागणार आहे. त्यामुळे भाड्यावरून प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये होणारे वाद टाळण्यास मदत होणार आहे.
भाडेवाढीमागे कारण काय?
इंधनाच्या वाढत्या किमती, रिक्षांच्या देखभाल आणि दुरुस्तीचा वाढलेला खर्च तसेच विम्याच्या रकमेत झालेली वाढ यामुळे सुधारित भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा पुणे जिल्ह्यातील सुमारे १.५ लाख रिक्षाचालकांना फायदा होण्याची शक्यता आहे.
मात्र, दुसरीकडे रिक्षाभाड्यात वाढ झाल्याने दररोज रिक्षाने प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी आणि महिलांच्या मासिक खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नव्या भाडेवाढीचा थेट परिणाम प्रवाशांच्या बजेटवर होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App