विशेष प्रतिनिधी
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाला जवळपास चार वर्षे पूर्ण होत आली आहेत. मात्र, दोन्ही देशांमधील संघर्ष अद्यापही संपलेला नाही. रशिया आणि युक्रेनकडून एकमेकांच्या लक्ष्यांवर सातत्याने हवाई हल्ले केले जात असल्याने या भागातील तणाव कायम आहे. या युद्धाचा परिणाम केवळ या दोन देशांपुरता मर्यादित न राहता जगातील अनेक देशांवरही झाला आहे.
युद्ध थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी पुढाकार घेतला होता. मात्र, अद्याप या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळालेले नाही.
दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत झालेल्या भेटीदरम्यान युक्रेनमधील संघर्षावर भारताची भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली. किर्गिस्तानमध्ये सुरू असलेल्या SCO (Shanghai Cooperation Organisation) शिखर परिषदेदरम्यान ३१ ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट झाली. या भेटीत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांसह विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर शांततेचा स्पष्ट संदेश दिला. “अनंत काळापर्यंत चालणाऱ्या युद्धाकडून आता आपण युद्धाच्या समाप्तीकडे वाटचाल केली पाहिजे,” असं म्हणत मोदींनी संघर्ष संपवण्याच्या दिशेने ठोस प्रयत्न करण्याचं आवाहन केलं.
भारत रशिया-युक्रेन संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांना यापुढेही पाठिंबा देत राहील, असं मोदींनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले?
युक्रेनमधील संघर्षावर शांततापूर्ण तोडगा काढण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. युद्धाचा प्रत्येक दिवस मानवतेसाठी नुकसानकारक ठरत असल्याचं त्यांनी नमूद केलं. संघर्ष सुरू राहिल्याने जगाच्या प्रगतीला चालना मिळण्याऐवजी मानवतेला मागे जाण्याची वेळ येते, असंही त्यांनी सांगितलं.
पुतिन यांच्याशी झालेल्या चर्चेदरम्यान मोदी म्हणाले की, युक्रेनच्या मुद्द्यावर भारत आणि रशियामध्ये यापूर्वीही अनेकदा चर्चा झाली आहे. मागील भेटीत पुतिन यांनी या संघर्षाच्या विविध पैलूंबाबत त्यांना माहिती दिली होती, असंही मोदींनी नमूद केलं.
#WATCH | Bishkek, Kyrgyzstan: During bilateral meeting with Russian President Vladimir Putin, Prime Minister Narendra Modi says, "We have consistently discussed the issue of Ukraine. When we met previously, you briefed me in detail on all aspects of the matter. As you know, India… pic.twitter.com/o9GPygjKAW — ANI (@ANI) August 31, 2026
#WATCH | Bishkek, Kyrgyzstan: During bilateral meeting with Russian President Vladimir Putin, Prime Minister Narendra Modi says, "We have consistently discussed the issue of Ukraine. When we met previously, you briefed me in detail on all aspects of the matter. As you know, India… pic.twitter.com/o9GPygjKAW
— ANI (@ANI) August 31, 2026
“भारत शांततेसाठी केल्या जाणाऱ्या सर्व प्रयत्नांचं कायम समर्थन करत आला आहे आणि यापुढेही करत राहील. युद्धात जाणारा प्रत्येक दिवस मानवतेला मागे घेऊन जातो. त्याउलट, शांततेच्या दिशेने टाकलेलं प्रत्येक पाऊल मानवतेमध्ये नवी आशा आणि उत्साह निर्माण करतं,” असं मोदींनी म्हटलं.
पुढे बोलताना त्यांनी युद्ध लांबवण्याऐवजी त्याच्या समाप्तीसाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. “अनंत काळापर्यंत चालणाऱ्या युद्धाकडून आता आपण युद्धाच्या समाप्तीकडे वाटचाल केली पाहिजे. मानवतेच्या कल्याणासाठी हे अत्यंत आवश्यक आहे,” असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘हा भारताचा संदेश आहे’
रशिया-युक्रेन संघर्षातील सर्व प्रश्नांवर लवकरात लवकर शांततापूर्ण तोडगा निघावा, अशी भारताची भूमिका असल्याचं मोदींनी स्पष्ट केलं. युद्धामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका सामान्य नागरिकांसह संपूर्ण मानवतेला बसत असल्याने शांततेचा मार्ग स्वीकारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
“सर्व मुद्द्यांवर लवकरात लवकर शांततापूर्ण तोडगा काढणं ही मानवतेची हाक आहे आणि हाच भारताचा संदेश आहे,” असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
भारताची भूमिका स्पष्ट करताना मोदींनी महात्मा गांधी आणि गौतम बुद्ध यांच्या विचारांचाही संदर्भ दिला. “गांधी आणि बुद्धांची ही भूमी एकच संदेश देते आणि तो म्हणजे शांततेचा मार्ग,” असं म्हणत त्यांनी रशिया-युक्रेन युद्धाचा शांततापूर्ण तोडगा काढण्यावर भारताचा भर असल्याचं पुन्हा स्पष्ट केलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App