विशेष प्रतिनिधी
ब्राझीलिया : भारत आणि ब्राझील यांनी द्विपक्षीय व्यापार आणि आर्थिक सहकार्य आणखी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ब्राझीलमधील ब्राझीलिया येथे भारत-ब्राझील व्यापार देखरेख यंत्रणेची (Trade Monitoring Mechanism) आठवी बैठक पार पडली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे सचिव राजेश अगरवाल आणि ब्राझीलच्या विकास, उद्योग, वाणिज्य आणि सेवा मंत्रालयाच्या परकीय व्यापार सचिव तातियाना लासेर्डा प्राझेरेस यांनी या बैठकीचे सहअध्यक्षपद भूषवले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला डी सिल्वा यांच्या नेतृत्वाखाली भारत-ब्राझील संबंधांना सातत्याने बळ मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर झालेल्या बैठकीत दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक आणि आर्थिक सहकार्य वाढवण्याच्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
2030 पर्यंत 30 अब्ज डॉलर व्यापाराचे लक्ष्य
भारत आणि ब्राझीलमधील द्विपक्षीय व्यापारात गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. 2025-26 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार 15.07 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचला. औषधनिर्मिती, रसायने, अभियांत्रिकी वस्तू आणि यंत्रसामग्री यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवून 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 30 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट दोन्ही देशांनी निश्चित केले आहे.
वाणिज्य सचिव राजेश अगरवाल यांनी ब्राझीलचे विकास, उद्योग, वाणिज्य आणि सेवा मंत्री मार्सिओ एलियास रोझा यांचीही भेट घेतली. यावेळी द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्यासह प्राधान्य क्षेत्रांमध्ये आर्थिक सहकार्य मजबूत करण्याबाबत चर्चा झाली.
भारत-मर्कोसुर कराराला अंतिम स्वरूप देण्यावर भर
बैठकीत भारत आणि मर्कोसुर (MERCOSUR) यांच्यातील प्राधान्य व्यापार कराराच्या अटी आणि कार्यक्षेत्राचाही आढावा घेण्यात आला. या कराराचा विस्तार आणि आधुनिकीकरण करण्यासाठी मोठी क्षमता असल्याचे दोन्ही बाजूंनी मान्य केले.
2025 मध्ये भारत आणि मर्कोसुरमधील व्यापार 20.84 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचला आहे. त्यामुळे व्यापारवाढीच्या दृष्टीने या कराराला लवकरात लवकर अंतिम स्वरूप देण्यावर दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.
भारतीय औषधांना ब्राझीलमध्ये मोठी बाजारपेठ मिळण्याची शक्यता
भारतीय औषधनिर्मिती क्षेत्रासाठी ब्राझीलची बाजारपेठ अधिक सुलभ करण्याच्या मुद्द्यावरही बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. भारताच्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेचे (CDSCO) आणि ब्राझिलियन हेल्थ रेग्युलेटरी एजन्सी (ANVISA) यांच्यात फेब्रुवारी 2026 मध्ये झालेल्या करारामुळे आरोग्य आणि औषधनिर्मिती क्षेत्रातील सहकार्याला संस्थात्मक आधार मिळाला आहे.
भारतीय औषधे किफायतशीर आणि गुणवत्तापूर्ण असल्याने ब्राझीलच्या बाजारपेठेत त्यांना अधिक व्यापक प्रवेश मिळावा, यासाठी नियामक प्रक्रिया अधिक सुसूत्र आणि सुलभ करण्याची गरज भारताने अधोरेखित केली.
कृषी व्यापार आणि व्यापार सुलभीकरणावरही चर्चा
कृषी क्षेत्रातही दोन्ही देशांनी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा केली. प्रमुख कृषी उत्पादनांसाठी वनस्पती आरोग्यविषयक बाबींवर सहकार्य करण्यास तसेच कृषी उत्पादनांच्या व्यापारासाठी तांत्रिक अडथळे दूर करण्याच्या दृष्टीने कालबद्ध कृती आराखडा तयार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली.
याशिवाय इलेक्ट्रॉनिक मूळ प्रमाणपत्रांची परस्पर मान्यता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME), उद्योजकता आणि हस्तकला क्षेत्रातील सहकार्य याबाबतही सकारात्मक प्रगती झाल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
BRICS, G20 आणि WTOमध्ये समन्वय वाढवणार
भारत आणि ब्राझील यांनी BRICS, G20 आणि जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) विविध बहुपक्षीय मंचांमध्ये समन्वय अधिक मजबूत करण्याचा पुनरुच्चार केला. मुक्त, सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख बहुपक्षीय व्यापार व्यवस्थेला चालना देण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करणार आहेत.
भारताने BRICS आर्थिक भागीदारी 2030 जागतिक मूल्य साखळी कृती आराखडा 2026-2030 पुढे नेण्यासाठी ब्राझीलने केलेल्या सक्रिय सहभागाचे कौतुक केले. तसेच भारताच्या BRICS अध्यक्षपदाच्या काळात सुरू करण्यात आलेल्या BRICS Startup Knowledge Hub आणि BRICS Business Incubator यांसारख्या उपक्रमांचे ब्राझीलने स्वागत केले.
25 भारतीय उद्योगांचे शिष्टमंडळ ब्राझीलमध्ये
द्विपक्षीय बैठकीसोबतच ब्राझीलिया येथे भारत-ब्राझील उच्चस्तरीय व्यापार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले. वाणिज्य सचिव राजेश अगरवाल यांनी सुमारे 25 भारतीय उद्योगांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. यात किर्लोस्कर ग्रुप, यूपीएल, आदित्य बिर्ला ग्रुप यांसारख्या प्रमुख उद्योग समूहांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता.
महत्त्वपूर्ण खनिजे, अक्षय ऊर्जा, कृषी व्यवसाय, पायाभूत सेवा, डिजिटल सेवा, लॉजिस्टिक्स आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींवर या मेळाव्यात चर्चा झाली.
नवी दिल्ली येथे ApexBrasil कार्यालय सुरू झाल्याचेही दोन्ही देशांनी स्वागत केले. या कार्यालयामुळे भारत-ब्राझीलमधील व्यवसाय-ते-व्यवसाय संबंध अधिक मजबूत होण्यासोबतच भारतात ब्राझीलच्या गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
भारत आणि ब्राझील यांच्यातील संबंध परस्पर विश्वास, लोकशाही मूल्ये आणि वाढत्या आर्थिक सहकार्याच्या आधारावर सातत्याने मजबूत होत आहेत. या बैठकीमुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि आर्थिक भागीदारीला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App