विशेष प्रतिनिधी
बारामती : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर सरकार सकारात्मक असून, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना या प्रश्नावर तोडगा काढण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विखे-पाटील हे जरांगे यांच्याशी चर्चा करीत असून, येत्या एक-दोन दिवसांत या प्रश्नावर निश्चित तोडगा निघेल. तसेच लक्ष्मण हाके यांच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील, असा विश्वास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. Jarange-Patil
इंदापूर येथे रविवारी (ता. ३०) माध्यमांशी बोलताना भरणे यांनी मराठा आरक्षणासह ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरही सरकारची भूमिका स्पष्ट केली. भरणे पुढे म्हणाले, मराठा आणि ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर सरकार सकारात्मक असून, छगन भुजबळ यांच्याशीही चर्चा केली जाईल. मात्र, कोणत्याही परिस्थितीत जाती-जातींमध्ये संघर्ष निर्माण होऊ नये, अशी सरकारची भूमिका आहे. जातीय सलोखा कायम ठेवून सर्वांनी काम केले पाहिजे, असे भरणे म्हणाले. लक्ष्मण हाके यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर उपस्थित केलेल्या प्रश्नांवरही हाके आणि ज्येष्ठनेते छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करून भूमिका समजून घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील ओबीसी मोर्चाबाबत सरकारची भूमिका काय, यावर बोलताना मोर्चा होऊ द्यायचा नाही अशी भूमिका नसून, चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असे भरणे यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार घेतील तो निर्णय मान्य….
खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवार यांनी स्थापन केला असून तो त्यांच्याकडून चुकीच्या मार्गाने काढून घेतला’ असे विधान केले होते. यावर बोलताना भरणे म्हणाले , आमच्या पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा पवार आहेत. त्या जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे भरणे यांनी स्पष्ट केले.
कर्जमाफीच्या याद्या कागदपत्रे पूर्ण झाल्यानंतर….
शेतकऱ्यांची आवश्यक कागदपत्रे आणि केवायसीची प्रक्रिया पूर्ण होत जाईल, त्याप्रमाणे याद्या प्रसिद्ध केल्या जातील. कोणताही शेतकरी या प्रक्रियेत वंचित राहणार नाही. मुख्यमंत्री आणि सरकारने शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन निश्चितपणे पूर्ण केले जाईल. त्यामुळे शेतकरी बांधवांनी काळजी करू नये, असे आवाहन भरणे यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App