विशेष प्रतिनिधी
मुंबई : अन्नपदार्थांच्या उत्पादन आणि एक्सपायरी डेटमध्ये कथित फेरफार करून त्यांची पुन्हा विक्री केल्याच्या गंभीर प्रकाराचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला आहे. FDA ठाणे विभाग आणि नवी मुंबई गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत तुर्भे येथील एका आस्थापनातून तब्बल ४ हजार ९४२ कार्टन अन्नपदार्थांचा सुमारे १७.५२ कोटी रुपयांचा साठा जप्त केला आहे.
या प्रकरणी तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे. ही कारवाई २४ ते २९ ऑगस्टदरम्यान तुर्भे येथील TTC औद्योगिक परिसरातील M/s Sadhana Enterprises येथे करण्यात आली. FDA च्या प्राथमिक तपासणीनुसार, संबंधित आस्थापनात विविध १० निर्यातदार कंपन्यांचे अन्नपदार्थ साठवून ठेवण्यात आले होते.
या उत्पादनांवरील मूळ उत्पादन तारीख आणि एक्सपायरी अथवा ‘यूज बाय’ तारीख कथितपणे पुसून त्यावर नव्या तारखा छापल्या जात असल्याचा आरोप आहे. तपासणीदरम्यान काही अन्नपदार्थांच्या मूळ पॅकेजिंगवरील घटकांची माहिती आणि पौष्टिक मूल्यांशी संबंधित तपशील बदलण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. मूळ माहितीवर नवीन स्टिकर्स लावून संबंधित अन्नपदार्थांचे पुन्हा पॅकिंग करून बाजारात विक्रीसाठी पाठविले जात असल्याचा संशय FDA ने व्यक्त केला आहे.
जप्त करण्यात आलेल्या साठ्यात अनेक लोकप्रिय खाद्यपदार्थ आणि पेयांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये Lay’s चिप्स, Kurkure, Bingo, Fun Flips, Maggi नूडल्स, Rasoi रेडी-टू-ईट उत्पादने, Knorr सूप, Hellmann’s मेयोनेज, Thums Up आणि Limca यांसारख्या उत्पादनांचा समावेश आहे. हा माल मुंबई, दिल्ली आणि नोएडा येथील निर्यातदारांशी संबंधित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या कारवाईत सुमारे १.३० लाख रुपये किमतीचे विनालेबल आणि मुदत संपलेले अन्नपदार्थही जप्त करण्यात आले आहेत.
याशिवाय M/s Unique Fragrances, M/s Pristine Worldwide आणि M/s Vipul Doshi या आणखी तीन आस्थापनांमधून नमुने घेण्यात आले आहेत. या आस्थापनांकडे आवश्यक FSSAI परवाना आणि खरेदीची बिले नसल्याचा संशय असल्याने पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
या प्रकरणी Sadhana Enterprises च्या भागीदारांसह संबंधित निर्यातदारांविरोधात अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील विविध कलमांनुसार तुर्भे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. FDA ने संबंधित आस्थापनाचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित केला आहे.
महाराष्ट्राचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे आणि ठाणे विभागाचे संयुक्त आयुक्त (अन्न) सचिन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणारी कोणतीही कारवाई खपवून घेतली जाणार नाही. मुदत संपलेल्या किंवा तारखांमध्ये फेरफार केलेल्या अन्नपदार्थांचा साठा आणि विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहील, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App