‘वेळीच लक्ष दिलं असतं तर 3 बाळांचे जीव वाचले असते?’ अमरावती रुग्णालयातील आगीचं धक्कादायक कारण समोर

विशेष प्रतिनिधी

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील SNCU (नवजात शिशू अतिदक्षता विभाग) मध्ये लागलेल्या भीषण आगीत तीन नवजात बालकांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. पहाटे साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेनंतर आता रुग्णालयातील सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

या घटनेच्या तपासात रुग्णालयातील विद्युत यंत्रणेतील संभाव्य बिघाड आणि सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी समोर येत आहेत. दुर्घटनाग्रस्त SNCU जवळील दुसऱ्या युनिटमध्ये महिनाभरापूर्वी वॉशिंग मशीन जळाल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला असता, विद्युत यंत्रणेतील बिघाड वेळीच लक्षात आला असता आणि कदाचित पुढील दुर्घटना टाळता आली असती, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

फायर ऑडिटकडेही दुर्लक्ष?

या दुर्घटनेनंतर रुग्णालयाच्या फायर सेफ्टी व्यवस्थेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या फायर ऑडिटची मुदत 21 ऑगस्ट रोजी संपली होती. त्यापूर्वी 17 जुलै रोजी फायर ऑडिट करण्यासंदर्भात PWD ला पत्र देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, त्यानंतरही फायर ऑडिट करण्यात आले नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे 38 दिवसांच्या कथित विलंबामुळे रुग्णालयातील अग्निसुरक्षेची स्थिती तपासली गेली नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे.

व्हेंटिलेटरचा स्फोट, मात्र अलार्म वाजलाच नाही?

आगीच्या घटनेदरम्यान व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, एवढी गंभीर घटना घडूनही फायर अलार्मने वेळीच इशारा दिला नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणा आणि सुरक्षा उपकरणांची देखभाल नेमकी कशी केली जात होती, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे तपासातून नेमकी कोणाची चूक समोर येते आणि जबाबदारी कोणावर निश्चित केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.

36 नवजात बालकांची प्रकृती स्थिर

दरम्यान, या दुर्घटनेतून बचावलेल्या 36 नवजात बालकांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. या सर्व बालकांवर अमरावती शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

या घटनेप्रकरणी गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून दुर्घटनेचा तपास सुरू आहे. आगीचे नेमके कारण, सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी याचा तपास झाल्यानंतरच या दुर्घटनेमागचं संपूर्ण सत्य स्पष्ट होणार आहे.

Amravati Hospital Fire

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात