विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित ५०० कोटी रुपयांच्या ऑडिओ क्लिपवरून महायुतीतील भाजप आणि शिवसेनेतील मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. केंद्रीय राज्यमंत्री आणि शिवसेना नेते प्रतापराव जाधव यांनी भाजपला थेट इशारा देत ‘आमचा आवाज कोणीच दाबू शकत नाही. सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे,’ अशी भूमिका मांडली आहे. या कथित ऑडिओ क्लिपची सखोल फॉरेन्सिक तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपशी संबंधित व्यक्तींची नावे येत असल्याचा दावा करत जाधव यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी भाजपनेही स्वीकारली पाहिजे, असे म्हटले आहे.
‘या ऑडिओ क्लिपमध्ये भाजपच्या लोकांची नावे येत असतील, तर भाजपनेच सर्वप्रथम चौकशीची मागणी केली पाहिजे. मित्रपक्षाची बदनामी करण्याचा प्रयत्न होत असेल, तर सत्य बाहेर आलेच पाहिजे,’ असे जाधव यांनी स्पष्ट केले.
प्रतापराव जाधव म्हणाले,
‘एकनाथ शिंदे यांनी ५० आमदारांसह उठाव केला नसता, तर भाजपला अडीच वर्षे सत्ता दिसली नसती. आम्ही ५० जणांनी भाजपला मदत केली म्हणून त्यांना सत्तेत येता आले.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाचे निर्णय राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतले जातात. त्यामुळे या निर्णयांबाबत कोणाला आक्षेप असेल, तर त्यांनी वरिष्ठ नेतृत्वाकडे भूमिका मांडावी, असा टोलाही त्यांनी भाजप नेते प्रवीण दरेकर यांना लगावला.भाजप आणि शिवसेनेतील वाढत्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर जाधव यांनी आक्रमक भूमिका घेतली.
‘अरेला कारे करण्याची भाषा आम्हालाही बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवली आहे. ती आमच्या रक्तात आहे,’ असे सांगत शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व मजबूत असून, त्यांची राजकीय प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न शिवसैनिक सहन करणार नाहीत, असेही जाधव यांनी नमूद केले. शिंदे यांच्याबरोबरच खासदार श्रीकांत शिंदे यांनाही या वादात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या कथित ऑडिओ क्लिपच्या वेळेबाबतही प्रतापराव जाधव यांनी प्रश्न उपस्थित केले.
जुनी असल्याचा दावा करण्यात येणारी क्लिप विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच का समोर आणण्यात आली, यामागील नेमका हेतू काय, याचीही चौकशी झाली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
क्लिपमधील गंभीर आरोपांची सत्यता तपासून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक तपासणी करण्याचे आदेश दिल्याचे जाहीर केले आहे. क्लिपमधील आवाज कोणाचे आहेत, संभाषण खरे आहे की बनावट आणि ती इतक्या कालावधीनंतर समोर आणण्यामागे कोणता हेतू आहे, याची तपासणी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भाजप नेते आशिष शेलार यांनी या क्लिपमध्ये भाजपच्या कोणत्याही नेत्याचा आवाज असल्याचा दावा फेटाळला असून, क्लिपची सत्यता तपासण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App