आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली नेमकं काय सुरू होतं? FDAचा दणका; पुण्यातील ३ कंपन्यांचे परवाने रद्द

विशेष प्रतिनिधी

मुंबई : आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या उत्पादकांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. राज्यातील १० आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून, त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील तीन संस्थांचा समावेश आहे.

राज्यातील आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची व्यापक तपासणी मोहीम FDAकडून राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण ४३४ संस्थांची तपासणी करण्यात आली. तपासणीत नियमांचे पालन न करणाऱ्या १३५ संस्थांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली. तर गंभीर स्वरूपाचे नियमभंग आढळलेल्या १० संस्थांचे उत्पादन परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले.

पुण्यातील कोणत्या संस्थांवर कारवाई?

FDAच्या कारवाईत पुणे जिल्ह्यातील तीन संस्थांचा समावेश आहे. यामध्ये बारामती येथील कृष्णा हर्बल, पुणे शहरातील कालिदास गांधी आणि जेजुरी एमआयडीसी, पुरंदर येथील इंडकेअर फार्मा प्रा. लि. या संस्थांचा समावेश आहे.



नेमके कोणते नियम मोडले?

तपासणीदरम्यान संबंधित संस्थांमध्ये औषध उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या चांगल्या उत्पादन पद्धतींचे (GMP) पालन होत नसल्याचे आढळून आले. काही ठिकाणी औषध निर्मितीसाठी आवश्यक तांत्रिक कर्मचारी उपलब्ध नसल्याचे, तसेच गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी योग्य व्यवस्था नसल्याचे समोर आले.

औषधांचे उत्पादन आणि गुणवत्ता तपासण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीचा अभावही काही संस्थांमध्ये आढळला. त्याचबरोबर उत्पादन परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे तपासणीत निदर्शनास आले.

औषधांच्या नोंदींमध्येही अनियमितता

कच्च्या औषधी पदार्थांचा वापर आणि तयार करण्यात आलेल्या औषधांच्या नोंदी व्यवस्थित ठेवण्यात आलेल्या नसल्याचेही तपासणीत आढळले. काही औषधांच्या लेबलवर उत्पादनाची तारीख चुकीची नमूद करण्यात आली होती.

याशिवाय कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी आणि त्यांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाच्या नोंदी उपलब्ध नसल्याचेही समोर आले. नियमांचे अशा प्रकारे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर FDAने संबंधित संस्थांविरोधात कठोर कारवाई केली आहे.

या कारवाईमुळे आयुर्वेदिक औषधांच्या उत्पादनात गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंपन्यांना FDAने स्पष्ट इशारा दिला आहे.

FDA’s Major Action Against Ayurvedic Drug Makers

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात