विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याची मोठी जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. पुढील ३५ वर्षांत विद्यार्थी आणि युवा व्यावसायिक देशासाठी काय योगदान देतात, कोणत्या समस्या ओळखतात आणि त्यावर कोणते उपाय शोधतात, यावर भारताची पुढील दिशा ठरणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
आयआयटी दिल्लीच्या ५७व्या दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना मोदी यांनी केवळ प्रश्न विचारण्याऐवजी त्या प्रश्नांची उत्तरे आणि समाजासमोरील समस्यांवर उपाय शोधण्याची वृत्ती विकसित करण्याचे आवाहन केले.
“मी अनेक आयआयटी माजी विद्यार्थ्यांचे यश पाहिले आहे. त्यांनी अशा समस्या ओळखल्या ज्या इतरांच्या लक्षातही आल्या नव्हत्या. त्यामुळे सतत शिकत राहा. केवळ प्रश्न विचारू नका, तर त्या प्रश्नांवर उपाय शोधण्याचाही प्रयत्न करा,” असे मोदी यांनी सांगितले.
या दीक्षांत समारंभात ५८७ पीएचडी संशोधकांसह तीन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पंतप्रधानांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी आणि पदके प्रदान करण्यात आली.
‘परम प्रज्ञा’ सुपरकॉम्प्युटरचे उद्घाटन
या कार्यक्रमादरम्यान मोदी यांनी आयआयटी दिल्लीच्या सोनीपत कॅम्पसमध्ये उभारण्यात आलेल्या ‘परम प्रज्ञा’ या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उच्च क्षमतेच्या सुपरकॉम्प्युटरचे दूरस्थ पद्धतीने उद्घाटन केले.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मोदी यांनी हलक्याफुलक्या शैलीत त्यांच्या मनातील भविष्यातील विचारांचा उल्लेख केला. “मी काही बाबा बागेश्वर नाही, पण तुमच्या मनात सध्या अनेक वेगवेगळे विचार सुरू असतील,” असे ते म्हणाले.
काही विद्यार्थी पहिल्या पगाराची वाट पाहत असतील, काहींना स्वतःचे स्टार्टअप सुरू करायचे असेल, तर काही जण नव्या स्पर्धात्मक आव्हानांसाठी तयारी करत असतील, असे मोदी यांनी नमूद केले.
‘सतत शिकणारेच भविष्यात यशस्वी होतील’
जग अतिशय वेगाने बदलत असल्याचे सांगत मोदी म्हणाले की, तंत्रज्ञान, शिक्षण आणि जागतिक सत्तेची समीकरणे वेगाने बदलत आहेत. त्यामुळे पुढील २० ते ३० वर्षांनंतर जगाचे स्वरूप नेमके कसे असेल, याचा अंदाज बांधणेही कठीण आहे.
मात्र, प्रत्येक बदलासोबत नवीन आव्हाने आणि नवीन संधी निर्माण होतात. “उद्योग आणि व्यवसाय बदलत राहतील; पण सतत शिकणारेच यशस्वी होतील. नवीन आव्हानांवर उपाय शोधणारेच पुढे जातील. आयआयटीमध्ये तुम्ही नेमके हेच शिकलात,” असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
‘आयआयटीबाहेरची परीक्षा आउट ऑफ सिलॅबस’
कॅम्पसमधील शिक्षण आणि प्रत्यक्ष जीवनातील आव्हाने यामध्ये मोठा फरक असल्याचेही पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
“आयआयटीमध्ये ठरलेला अभ्यासक्रम असतो. मात्र बाहेरच्या जगात जवळपास सर्व काही ‘आउट ऑफ सिलॅबस’ असते. खरी परीक्षा काय असेल किंवा प्रश्न कोणता असेल, हे आधी सांगितले जात नाही. अनेकदा तुम्हालाच समस्या शोधावी लागते आणि त्याचे उत्तरही स्वतःच तयार करावे लागते,” असे मोदी म्हणाले.
‘पुढील ३५ वर्षे भारतासाठी निर्णायक’
देशाच्या इतिहासाचा संदर्भ देताना मोदी यांनी प्रत्येक पिढीसमोर वेगवेगळी आव्हाने आणि जबाबदाऱ्या असल्याचे सांगितले.
स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीसमोर देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याचे ध्येय होते. त्या पिढीच्या संघर्ष आणि त्यागामुळे आजचा भारत उभा राहिला आहे. आता विकसित भारत घडवण्याची जबाबदारी सध्याच्या पिढीवर आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
“पुढील ३५ वर्षांत तुम्ही काय करता, देशाच्या गरजांना कसा प्रतिसाद देता आणि कोणत्या समस्यांवर उपाय शोधता, यावर भारताची पुढील दिशा ठरेल,” असे पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
‘तुमची स्पर्धा इतरांशी नाही, स्वतःशी’
विद्यार्थ्यांनी इतरांच्या पगाराचे पॅकेज, नोकरी, परदेशातील संधी किंवा स्टार्टअप यांच्याशी स्वतःची तुलना करू नये, असा सल्लाही मोदी यांनी दिला.
“तुमची शर्यत इतर कोणाशीही नाही, तर स्वतःशी आहे. कालपेक्षा आज स्वतःला अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करा. मोठ्या ध्येयांचा पाठपुरावा करताना आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचीही काळजी घ्या,” असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
IIT दिल्लीच्या या दीक्षांत समारंभातून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान आणि शिक्षणासोबतच समस्या सोडवण्याची वृत्ती, सतत शिकण्याची तयारी आणि देशाच्या विकासासाठी योगदान देण्याचा संदेश मिळाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App