विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या (IIT Delhi) दीक्षांत समारंभाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी वेगाने बदलणारे जागतिक वातावरण, तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि भविष्यातील आव्हानांवर भाष्य केले. “परिवर्तन जो स्वीकारतो, त्याचाच विजय होतो. जो शिकत राहतो, तोच जिंकतो,” असा संदेश मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला. IIT students.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “तुम्ही केवळ पदवी घेऊन येथून बाहेर पडत नाही, तर स्वप्न घेऊन जात आहात. IIT दिल्लीमध्ये आल्याचा तुमचा पहिला दिवस आठवा. या प्रवासात तुमचे मित्र, शिक्षक, प्रोफेसर, मेंटॉर आणि स्टाफ हे तुमच्या कुटुंबाचा भाग बनले आहेत.”
“तुमच्या प्रोफेसरांनी तुम्हाला घडवले आहे. हळूहळू हे कॅम्पस तुमचं घर बनलं. भविष्यात तुम्ही जेव्हा यश मिळवाल, तेव्हा या सर्वांची नक्कीच आठवण येईल. त्यामुळे त्यांच्याप्रती कृतज्ञता कायम ठेवा आणि हे नातं एक मोठी संपत्ती म्हणून सोबत घेऊन जा,” असेही मोदी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना निरोप देताना मोदी यांनी त्यांच्यातील मैत्री आणि नाती जपण्याचा सल्ला दिला. “जाता जाता एकमेकांना भेटून जा. तुम्ही जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहिलात तरी हे नातं कायम ठेवण्याचा प्रयत्न करा,” असे ते म्हणाले.
तंत्रज्ञानामुळे जगाचा वेगाने बदल
भविष्यातील आव्हानांबाबत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी जागतिक पातळीवर होत असलेल्या बदलांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. “तुम्ही अशा काळात या संस्थेतून बाहेर पडत आहात, जेव्हा जगात अतिशय वेगाने बदल होत आहेत. जगातील स्ट्रॅटेजिक समीकरणे बदलत आहेत. ग्लोबल पॉवर बॅलन्समध्येही सातत्याने परिवर्तन होत आहे,” असे मोदी म्हणाले.
या बदलामागे तंत्रज्ञानाचा वेग ही सर्वात मोठी शक्ती असल्याचे त्यांनी नमूद केले. “येत्या 20 ते 30 वर्षांत जग कसे असेल, हे आज सांगता येत नाही. मात्र, जेव्हा जेव्हा बदल होतो, तेव्हा आव्हाने निर्माण होतात आणि त्याचवेळी नव्या संधीही उपलब्ध होतात,” असे मोदी यांनी स्पष्ट केले.
“जग बदलेल, तंत्रज्ञान बदलेल आणि त्यासोबत काम करण्याच्या पद्धतीही बदलतील. अशा परिस्थितीत जो सतत शिकत राहील, तोच पुढे जाईल आणि जिंकेल. नव्या आव्हानांमध्ये नवे पर्याय शोधण्याची क्षमता विकसित करा. ज्या व्यक्तीसाठी आव्हान हेच संधीमध्ये रूपांतरित होते, तोच भविष्यात यशस्वी ठरतो,” असा कानमंत्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
IIT दिल्लीतील शिक्षणातून विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक ज्ञानच नव्हे, तर बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची आणि आव्हानांना संधीमध्ये रूपांतरित करण्याची क्षमता आत्मसात केली आहे, असेही पंतप्रधानांनी अधोरेखित केले.
A major message from Narendra Modi to IIT students.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App