विशेष प्रतिनिधी
मुंबई : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीमागे नेमकं कारण काय, तसेच प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेससाठी राजकीय सल्लागार म्हणून काम करत आहेत का, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पहिल्यांदाच यावर स्पष्ट भूमिका मांडली.
पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे यांनी प्रशांत किशोर यांच्याबाबत आपल्याला कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचं स्पष्ट केलं. “प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात, हे मलाच माहिती नाही. त्यांना राजकीय सल्लागार म्हणून नेमल्याचीही माझ्याकडे माहिती नाही,” असं तटकरे म्हणाले.
जर प्रशांत किशोर यांची पक्षाच्या राजकीय सल्लागारपदी नियुक्ती झाली असती, तर त्याची आपल्याला निश्चितच माहिती असती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज्य नेतृत्वाच्या पातळीवर प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याचा प्रश्नच येत नसल्याचं तटकरे यांनी सांगितलं.
‘एनडीएमध्ये जाण्याचा निर्णय सर्वांनी मिळून घेतला’
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एनडीएमधील सहभागाबाबतही तटकरे यांनी भाष्य केलं. एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय सर्वांनी एकत्रितपणे आणि हिरिरीने घेतला होता. हा निर्णय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी मोठी मेहनत घेतली आणि त्यातून पक्षाला यश मिळालं, असं त्यांनी सांगितलं.
त्यामुळे पक्षामध्ये दोन वेगवेगळे मतप्रवाह असल्याची चर्चा गैरवाजवी असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं. या चर्चेला वेगळा अर्थ देण्याचं कारण नसल्याचंही त्यांनी नमूद केलं.
‘माझं गोत्र मला माहिती आहे’
दरम्यान, पक्षात आपल्याबद्दल नाराजी असल्याच्या चर्चांवरही तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “माझ्याबद्दल नाराजी आहे, अशा बातम्या तुम्ही सांगता. तुमचं सूत्र काय सांगतं ते मला माहिती नाही; पण मला माझं गोत्र माहिती आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
आपण महाराष्ट्रातील जवळपास सर्व भागात आणि मतदारसंघांमध्ये काम केलं असून राज्याच्या राजकारणाचा मोठा अनुभव असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. “मी 41 वर्ष राजकारणात आहे. माझी राजकारणाची सुरुवात 1985 मध्ये काँग्रेसचा रोहा तालुका सरचिटणीस म्हणून झाली. त्याच वर्षी मला विधानसभेचं तिकीट मिळालं,” अशी माहिती त्यांनी दिली.
गेल्या 41 वर्षांपासून राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जिल्ह्यात सातत्याने काम करत असल्याचं सांगत तटकरे यांनी आपल्या राजकीय अनुभवाचाही दाखला दिला. त्यामुळे सध्या कोणाला काय वाटतं, याचा विचार करण्याची परिस्थिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App