विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे ‘ड्रग फ्री मुंबई’ या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नशामुक्त भारताचा’ संकल्प केला आहे. हा संकल्प पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन ‘ड्रग फ्री मुंबई’ आणि ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ करणे आवश्यक आहे.
भारत हा जगातील सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेला देश असून ही तरुणाईच विकसित भारताची सर्वात मोठी ताकद आहे. हीच युवा पिढी उद्याचा भारत घडविणार असून, त्यांना योग्य दिशा मिळाल्यास भारत जगाचा मार्गदर्शक ठरेल. भारताला आमनेसामने लढाईत पराभूत करणे शक्य नसल्याने, देशाला आतून कमकुवत करण्यासाठी तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यात अडकविण्याचे छुपे षडयंत्र रचले जात आहे. दुर्दैवाने, पैशाच्या मोहापोटी देशातील काही घटकही या कारवायांमध्ये सहभागी होत असून, त्यांचा वापर करून हे षडयंत्र अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ड्रगविरोधातील ही लढाई केवळ पोलीस प्रशासनाची नसून आरोग्य, सामाजिक न्याय, शालेय शिक्षण विभाग, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि समाजातील प्रत्येक घटकाला याविरोधात सामूहिक युद्ध सुरू करावे लागेल. ड्रग्जचा पुरवठा, उत्पादन आणि तस्करीविरोधात सरकारकडून कठोर कारवाई केली जात असली, तरी समाजाच्या सक्रिय सहभागाशिवाय हे अभियान यशस्वी होणार नाही.
गनिमी कावा
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याच्या माध्यमातून ड्रग माफियांचे संपूर्ण जाळे उद्ध्वस्त करावे लागणार आहे. यासाठी ड्रगची विक्री, पुरवठा किंवा व्यसनाधीनतेबाबतची माहिती तात्काळ प्रशासनापर्यंत पोहोचवावी, ही माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, तसेच भविष्यात त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी नमूद केले.
– Say No to Drugs
भारताची युवा पिढी हा देश चालवणार आहे. हेच युवा भविष्यातील डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक आहेत. त्यामुळे ड्रग विरोधात विद्यार्थ्यांचा ठाम निर्धार आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे ही ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचे नेत्र असून विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी शैक्षणिक संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. तसेच युवकांनी ‘Say No to Drugs’ हा संकल्प करून कोणत्याही आमिषाला किंवा दबावाला बळी न पडता अमली पदार्थांना ठाम नकार द्यावा. ड्रगच्या विरोधात सर्वांनी मिळून काम केल्यास पुढील 3 ते 4 वर्षांत ‘ड्रग फ्री मुंबई’, ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ आणि ‘नशामुक्त भारत’ साकार होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले. यावेळी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App