विशेष प्रतिनिधी
पुणे : Pune Toxic पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात घडलेल्या विषारी दारूकांडाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. विषारी गावठी दारू पिल्याने मृतांचा आकडा आता १५ वर पोहोचला असून अनेक जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपींसह आतापर्यंत ८ जणांना अटक केली असून संपूर्ण दारू पुरवठा साखळीचा तपास सुरू करण्यात आला आहे.Pune Toxic
फुगेवाडी, दापोडी, हडपसर आणि काळेपडळ या भागांत विषारी दारूची विक्री झाल्याचे तपासात समोर आले आहे. पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरात ९ जणांचा मृत्यू झाला, तर पुण्यातील हडपसर आणि परिसरात आणखी ६ जणांचा बळी गेला. मृतांमध्ये बहुतांश मजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या नागरिकांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.Pune Toxic
या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश रामचंद्र वानखेडे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह कर्नलसिंग तख्तसिंग विरका, गुरमंगतसिंग विरका, राधेश्याम प्रजापती आणि इतर आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींवर मनुष्यवधासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी मुंबईहून इथेनॉल आणि रासायनिक पदार्थ आणून त्यात मिश्रण करून विषारी दारू तयार करत होते. ही दारू घरातूनच तयार करून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध भागांत पुरवली जात होती. फुगेवाडीतील एका घरातूनच मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तांशी थेट चर्चा केली. “ही केवळ दुर्घटना नाही, तर एक प्रकारची हत्या आहे. संपूर्ण साखळी शोधून दोषींवर अतिशय कठोर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नाही,” असा इशारा फडणवीस यांनी दिला. तसेच या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्ग करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. परिसरात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याची माहिती आधीपासून होती, मात्र वेळेत कारवाई झाली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App