नाशिक : मुलाने आईच्या नावाची रिंग टाकली; आत्याबाईंची दांडी गुल केली!!, अशीच घडामोड जय पवारांच्या एका वक्तव्यामुळे घडली. जय पवारने सुनेत्रा पवारांच्या नावाची मुख्यमंत्री पदाची रिंग रिंगणात टाकली. सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी इच्छा व्यक्त केली. पण त्यामुळेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या महत्त्वाकांक्षेला छेद गेला. पवारांच्या घरातच मुख्यमंत्री पदाची स्पर्धा तीव्र झाली.
– जय पवारांच्या वक्तव्याला विरोध
सुनेत्रा पवारांना अपघाताने मिळालेल्या उपमुख्यमंत्री पदाला फक्त तीनच महिने पूर्ण झालेत, तरीसुद्धा जय पवारांनी त्यांच्या नावाची घोषणा मुख्यमंत्री पदासाठी केली. ही घोषणा करताना त्यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही विचारले नाही. त्यामुळे त्यांना सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी बहुमताच्या आकड्याविषयी सुनावले. रोहित पवारांनी त्यांना तर भाजपला विरोध केल्याशिवाय सुनेत्रा पवारांनाच काय, पण कुणालाच मुख्यमंत्री पद मिळणार नाही, असे ऐकवले.
– पवार आणि सुप्रियांच्या महत्त्वाकांक्षेला तडा
पण या सगळ्या राजकारणात सुप्रिया सुळे यांच्या दीर्घकालीन महत्त्वाकांक्षेला तडा गेला. वास्तविक शरद पवारांना आपल्या कन्येला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून खुर्चीवर बसलेले पाहायचे होते आणि आहे. पण अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर “बाहेरून आलेल्या पवारांना” उपमुख्यमंत्री झालेले बघायची वेळ त्यांच्यावर राजकीय नशिबाने आणली. सुप्रिया सुळे यांची कारकीर्द बारामतीच्या खासदारकी पलीकडे गेली नाही, तोच पवारांच्या दुसऱ्या नातवाने त्यांच्या कन्येच्या महत्त्वाकांक्षेला घरातूनच सुरूंग लावला. पार्थ पवारांनी कायमच शरद पवारांच्या इच्छेविरुद्ध राजकारण केले. त्यांच्याच दिशेने जय पवारही गेले. म्हणूनच तर त्यांनी सुनेत्रा पवारांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे आणले.
– पवारांचा घरातला एकछत्री अंमल संपला
एरवी महाराष्ट्रात आणि पवारांच्या घरात शरद पवार बोले आणि राजकारण हाले, अशी स्थिती होती. पवारांनी सांगितले आणि घरातल्यांनी कुणी ऐकले नाही, असे कधी घडले नाही. पवारांच्या इच्छेनुसारच सुप्रिया सुळे सोडून इतरांची नावे पवारांच्या घरातून कुणी पुढे आणली नाहीत, पण आता ती स्थिती कायमची इतिहासजमा झाली. आधी अजित पवारांनी बंड करून पवारांचा त्यांच्या कुटुंबातला एकछत्री अंमल संपविला. आता जय पवारांनी सुनेत्रा पवारांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करून शरद पवारांच्या इच्छेचा उरला सुरला अंमल देखील संपुष्टात आणला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App