नुपुर शर्मा : “भारत माफी नही मांगेगा” ही भाषा काँग्रेसच्या तोंडी; पण हे यश काँग्रेसचे की भाजपचे??


भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर विषयी वादग्रस्त उद्गार काढल्याने नंतर भाजपने त्यांना 6 वर्षांसाठी निलंबित केले, तर दिल्लीचे सोशल मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदल यांना पक्षातून काढून टाकले. परंतु मोहम्मद पैगंबर यांच्या विषयी गैरउद्गार काढल्याचे पडसाद आखाती देशांमध्ये उमटल्यानंतर भारतातले हिंदुत्ववादी सोशल मीडियाकार आणि काँग्रेसजन एकदम उसळले आहेत. अर्थात त्यांच्या उसळण्याची कारणे वेगवेगळी असली हे दोन्ही परपस्पर विरोधी घटक एकाच वेळी उसळल्याची वस्तुस्थिती आहे. Nupur sharma : Congress spoke BJP language

– हिंदुत्ववादी सोशल मीडियाकार

भारतातील हिंदुत्ववादी सोशल मीडियाकार उसळण्याचे कारण केवळ मोहम्मद पैगंबर याविषयी काही उद्गार काढल्याने जर भाजपचा प्रवक्ते निलंबित आणि पक्षाबाहेर होणार असतील?, तर मग हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी भाजपची बाजू तरी उचलून कशाला धरायची??, हे आहे. भाजपा आपल्या कार्यकर्त्यांचे संरक्षण करणार नसेल, त्यांच्या अडीअडचणीच्या काळात कामाला येणार नसेल तर भाजपच्या सरकारचा उपयोग काय??, असे सवाल विचारत हिंदुत्ववादी सोशल मीडियाकार भाजपवर चिडून आज शरसंधान साधत आहेत.

– काँग्रेसच्या तोंडची भाषा

तर, भाजपच्या प्रवक्त्याने केलेल्या चुकीची माफी भारत देश मागणार नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले आहेत… आणि इथेच याप्रकरणाची खरी राजकीय मेख आहे. आत्तापर्यंत हिंदुत्ववादी पक्ष म्हणून भाजपने “देश सर्वप्रथम” ही भूमिका अधिक ठळकपणे मांडली आहे. कोणत्याही सरकारांच्या चुकांमुळे देश झुकता कामा नये, ही भूमिका संघ परिवाराची आहे. नुपूर शर्मा प्रकरणामध्ये मात्र पवन खेडा यांच्या रूपाने काँग्रेसच्या प्रवक्त्याच्या तोंडी भारत देश माफी मागणार नाही, अशी भाषा आली आहे. मग काँग्रेसच्या प्रवक्त्याने अशी भाषा वापरणे हा काँग्रेसचा विजय आहे?? की भाजपचा??, हा कळीचा प्रश्न आहे. याचा विचार हिंदुत्ववादी सोशल मीडियाकारांनी केला पाहिजे की नको??, असा सवाल ठळकपणे करावासा वाटतो!!



– लिबरल मीडियाला आनंद

कम्युनिस्टांमध्ये जसे डावे, अतिडावे अतिअतिडावे असे पोटभेद पूर्वी तयार झाले होते, तसेच पोटभेद हिंदुत्ववाद्यांमध्ये ठळक झालेले दिसत आहेत. म्हणूनच सोशल मीडियाकार संजय दीक्षित, चतुर्वेदी तोफेल, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ वगैरे मंडळी भाजपवर चिडून बोलताना दिसत आहेत, तर नुपुर शर्माच्या भाजप झुकला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना आखाती देशांत पुढे म्हणजे पर्यायाने इस्लामी देशांपुढे झुकावे लागले म्हणून लिबरल सोशल मीडियाकार आनंदी झाले आहेत. इस्लामी देशांनी मोदींना झुकवले हा विशेष आनंद लिबरल सोशल मीडियाकार मोठ्या दणक्यात साजरा करत आहेत.

– ॲक्शन अपरिहार्य, पण कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष??

तिसरा पक्ष अर्थातच भाजपचा आहे. आपल्याच पक्षाच्या प्रवक्त्याने मोहम्मद पैगंबर याविषयी गैरउद्गार काढल्यानंतर निलंबित करण्याशिवाय पर्याय नाही हे जाणवल्यानंतर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी नुपुर शर्माच्या निलंबनाची ॲक्शन घेतली आहे. सत्ताधारी पक्षाच्या अतिवरिष्ठ नेत्यांनी त्याचे समर्थन करणे भाग आहे. पण कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल आहे ही वस्तुस्थिती नाकारण्यात मतलब नाही. सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी असेच वागायचे असते. कार्यकर्त्यांच्या आततायी वागण्याचे समर्थन करण्याचे कारण नसते. तसे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी समर्थन केलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. पण कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांनी त्याच वेळी काळजी घ्यायची असते या वस्तुस्थितीकडे भाजपच्या नेत्यांचे दुर्लक्ष होते काय?? हा खरा सवाल आहे.

– भाजपकडे “पोलिटिकल करेक्टनेसचा” अभाव

सोशल मीडियामध्ये आणि नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये डाव्या पक्षांचा हात धरण्याची आज हिंदुत्ववाद्यांची क्षमता नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सोशल मीडियात कोणत्याही कमेंट करताना जपून केल्या पाहिजेत यासाठी हिंदुत्ववाद्यांना खरंच प्रशिक्षणाची गरज आहे. आज जेव्हा राम मंदिराचा प्रश्न सुटला आहे, 370 कलम हटले आहे, काश्मीरमध्ये पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरू आहे, काशी मथुरेचे प्रश्न कायदेशीर पातळीवर ऐरणीवर आले आहेत, तेव्हा मुस्लिम कट्टरतावाद्यांना कोणतेही वक्तव्य करून आयते कोलीत हातात देण्याचे अजिबात कारण नाही. मुस्लिम कट्टरतावादी असे आयते कोलीत मिळवण्यासाठी टपून बसले आहेत. असे असताना सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता अथवा नेता म्हणून अधिक चाणाक्षपणे आणि काळजीपूर्वक आक्रमक बोलले पाहिजे हे भान सत्ताधारी भाजपच्या प्रवक्त्यांनी बाळगायला नको का?? “बात का बतंगड” किंवा “राईचा पर्वत” नुपुर शर्मा यांच्या विधानाच्या बाबतीत झाला हे खरे. ते नाकारण्याचे कारण नाही. पण मूळातच नसती आणि नको ती “बात” करू नये आणि “राई” पण ठेवू नये हे नेमके प्रशिक्षण भाजपच्या प्रवक्त्यांना देण्याची गरज आहे!! राजकीय परिभाषेत बोलायचे झाले तर भाजपच्या नेत्यांनी आणि प्रवक्त्यांनी “पोलिटिकल करेक्टनेस” अंगी बाणवण्यासाठी प्राविण्य मिळवले पाहिजे!!

– धडा कोणता शिकायचा??

अतिटोकाचे हिंदुत्व मांडणाऱ्यांकडून ही अपेक्षा नाही. किंबहुना त्यांच्यामुळे हिंदुत्ववाद्यांच्या राजकारणाचे आणि समाजकारणाचे मोठे नुकसान झाले आहे ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी अधिक जबाबदारीने, अधिक अचूकपणे बोलणे नव्हे, तर प्रत्यक्ष कृती करणे महत्त्वाचे नाही का?? नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदल यांच्या प्रकरणात भाजपच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी नेमका हा धडा घेण्याची गरज आहे!!

Nupur sharma : Congress spoke BJP language

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात