उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधून आणि आसामच्या गुवाहाटीतून एकच संदेश देण्यात आला आहे. या संदेशातला content नवा नाही, भूमिकाही नवी नाही. पण मीडियाला एकदम “नवसत्याचा” साक्षात्कार झाल्याप्रमाणे त्याच्या बातम्या देण्यात आल्या.त्यातही गाझियाबादच्या बातमीला तर एका रंगात रंगवून -रंगवून सांगण्याची मीडियामध्ये चढाओढ लागली होती.The Meetings of Minds: A Bridging Initiative – Dr Khawaja Iftikhar Ahmed’
या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले, की मॉब लिंचिंग हे हिंदुत्व नाही… झाल्या लगेच त्याच्या हेडलायनी. सरसंघचालकांनी हिंदू परिवाराला सुनावले वगैरे वगैरे…!!होय. सरसंघचालक म्हणालेच ना तसे, मॉब लिंचिंग हे हिंदुत्व नाही. पण ते पुढे हे देखील म्हणाले, की मॉब लिंचिंगच्या बऱ्याचशा केसेस खोट्या आहेत म्हणून…!! पण मीडियाने त्याच्या नाही हेडलायनी केल्या.
सरसंघचालकांचे ते विधान त्यांनी खाली छापले किंवा बातम्यांमध्ये under play केले. मीडियाची क्लृप्ती काही नवी नाही. पण म्हणून सरसंघचालकांच्या म्हणण्यातल्या आशय बदलत नाही किंवा त्याचा अर्थही बदलत नाही.
जमावाने एकत्र येऊन कोणालाही मारणे हा गुन्हा आहेच. यात कोणालाही शंका नाही. पण हा जमाव एकाच धर्माचा, पंथाचा हे गृहीत धरून चालणार नाही. याकडेही सरसंघचालकांनी मुद्दामहून लक्ष वेधले. ते मीडियाला दिसले नाही.
सरसंघचालकांनी मूळात हिंदू – मुस्लीम समस्येला हात घातला. परखड वक्तव्ये केली. प्रस्थापित बुध्दिवाद्यांना सुनावले. हिंदुस्थानात इस्लाम खतरे में वगैरे काहीही नाही. इस्लाम खतरे में हे एक प्रकारचे जाळे आहे. त्यात तुम्ही अडकू नका, असे मुस्लीम राष्ट्र मंचाच्या व्यासपीठावरून ते मुस्लीम समूदायासमोर म्हणाले. मीडियाला हे देखील दिसले नाही. ती काही हात न उंचावता संपलेली आणि ताकाला जाऊन भांडे लपविलेली राष्ट्रमंचची बैठक नव्हती…!!
हिंदू – मुस्लीम ऐक्य हा शब्दप्रयोग मूळातच दिशाभूल करणारा आहे. कारण दोन भिन्न समूदायांचे ऐक्य होऊ शकते. भारतातले हिंदू आणि मुसलमान हे एकाच पूर्वजांचे वंशज आहेत. तेही गेल्या ४० हजार वर्षांपासून…!! हे आता सिध्द झाले आहे. सर्व भारतीयांचा DNA सारखा आहे. त्यामुळे हिंदू – मुस्लीम ऐक्य वगैरे शब्दांचा वापर करून अनेकदा हे दोन्ही समाज भिन्न असल्याचे भासविण्याचा प्रयत्न होतो. तो आपण य़शस्वी होऊ देता कामा नये, असा इशाराही त्यांनी दिलाय. हा किती मूलगामी विचार सरसंघचालकांनी मांडलाय. त्यावर प्रचलित, प्रस्थापित आणि ल्यूटन्स मीडियाला काही भाष्य करावेसे वाटलेले नाही.
खरेतर सरसंघचालकांनी आपल्या मांडणीतून काँग्रेसने उचलून धरलेल्या मूळ संकल्पनेलाच उखडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावर खरोखर मंथन व्हायला हवे आहे. पण त्यासाठी चमकदार हेडलायनींच्या पलिकडे जाऊन विचार केला पाहिजे आणि मग युक्तिवाद केला पाहिजे. त्याची तयारी आहे का मीडियाची…?? हा खरा प्रश्न आहे.
जे गाझियाबादमधले तेच गुहावटीतले. तिथे मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मांनी लोकसंख्या विस्फोट या विषयावर उघडपणे १५० मुस्लीम साहित्यिक, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, इतिहास अभ्यासक, संगीतकार, सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते आदींची बैठक घेतली. बैठकीचा अजेंडा छुपा नव्हता. लोकसंख्या नियंत्रण या विषयावर खुलेपणाने आलाप आलोचना या उपक्रमाअंतर्गत चर्चा झाली.
मुस्लीम समाजातील पुरोगामी – प्रगतिशील घटकाला केलेले हे आवाहन आहे. आसाममध्ये लुंगी, दाढी आणि टोपी यांची सत्ता आणायला निघालेल्या समूहाला नाही. कारण त्या समूहाने नेहमीच धर्म, रंग यांच्याच आधारे लिंगभेद करून आपल्याच समाजाला मध्ययुगीन अज्ञानाच्या आणि धर्मांधतेच्या अंधारात लोटले आहे. लुंगी, दाढी आणि टोपी यांच्या सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या बद्रुद्दीन अजमल आणि काँग्रेसचा “आलाप” “आलोचना” या शब्दांशीही दूर – दूरपर्यंत संबंध नाही.
निवडणूक आली की धर्मांध कठमूल्यांशी संधान बांधायचे आणि मते घ्यायची एवढीच त्यांना अल्पसंख्यांक समाजाविषयी राजकीय उपयुक्तता राहिलेली आहे.या समाजाला अज्ञान अंधकाराच्या चिखलातून बाहेर काढण्याचे धैर्य हेमंत विश्वशर्मा दाखवत आहेत. या धैर्यात त्यांनी मुस्लीम समाजातील प्रगतिशील घटकांना सामील करून घेतलेय. कुटुंब नियोजन, लोकसंख्या विस्फोट यांच्यासारखे शब्दही उच्चारायला जो समाज कचरत होता, त्या विषयांना हेमंत विश्वकर्मांनी उघडपणे अजेंड्यावर आणले आहे.
आसामच्या लोकसंख्येचे स्थिरीकरण (Population stabilization) आसामी वांशिक मुस्लीमांचे संरक्षण हे विषय त्यांनी महत्त्वाचे मानले आहेत. “आलाप आलोचना” हा नित्य नियमाचा उपक्रम करण्याचा त्यांचा मनसूबा आहे. या मध्येच त्याचे वैशिष्ट्य सामावले आहे. हे आधी काँग्रेसच्या अखंड ६० – ७० वर्षांच्या राजवटीत घडले नव्हते. ते घडविण्याचा हेमंत विश्वशर्मा प्रयत्न करताहेत.
उत्तर प्रदेश मधल्या गाझियाबाद आणि आसाममधल्या गुवाहाटी येथे भलेही योगायोगाने एकाच दिवशी कार्यक्रम किंवा उपक्रम झाले असतील. पण त्यातून समाजाला दिलेला संदेश मात्र नक्कीच योगायोगाने दिलेला नाही, तर निश्चित आणि ठाम राष्ट्रवादी विचारांमधून साकारलेला तो अविष्कार आहे. एवढे आपण खात्रीने म्हणू शकतो…!!
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App