OLA-Uber-Rapido चालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम; परिवहन विभागाचे 8 मोठे निर्णय

विशेष प्रतिनिधी

 मुंबई : ओला, उबेर आणि रॅपिडोसह ॲप-आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या वाहनांवर आता परिवहन विभागाची अधिक कडक नजर राहणार आहे. ॲप-आधारित रिक्षा आणि टॅक्सी सेवांसाठी परिवहन विभागाने नवी नियमावली तयार केली असून, 1 सप्टेंबरपासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहनचालक आणि कंपन्यांना नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

ओला-उबर-रॅपिडो चालकांसाठी कोणते नवे नियम?

  • नव्या नियमावलीनुसार ॲप-आधारित प्रवासी सेवा देणाऱ्या कंपन्या आणि चालकांसाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.
  • ॲग्रीगेटर कंपन्यांना परिवहन प्राधिकरणाचा परवाना घेणे बंधनकारक असेल.
  • चालकांकडे वैध ड्रायव्हिंग लायसन्स, बॅच आणि व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक राहील.
  • बॅचसाठी अर्ज करताना संबंधित शहरातील 15 वर्षांचा रहिवासी दाखला आणि पोलिस पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक असेल.
  • चालकांना सलग 12 तासांपेक्षा जास्त वाहन चालवता येणार नाही.
  • चालकांना एकूण भाड्याच्या किमान 80 टक्के रक्कम देण्याची तरतूद करण्यात आली आहे.
  • वाहनांमध्ये GPS ट्रॅकिंग, चालकांची पडताळणी आणि ऑनलाइन देखरेख केली जाणार आहे.
  • संबंधित ॲप आणि वेबसाइट मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांमध्ये उपलब्ध असणे बंधनकारक राहील.
  • बनावट कागदपत्रांच्या आधारे परवाना घेतल्याचे आढळल्यास चालकाचा परवाना रद्द करून कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.


रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठीचे ज्ञान अनिवार्य

दरम्यान, रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचे प्राथमिक किंवा व्यवहारिक ज्ञान असणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासाठी अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी यापूर्वी तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. या कालावधीत राज्यभरातील एक लाखांहून अधिक अमराठी वाहनचालकांनी मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचा दावा करण्यात आला आहे.

आता मराठीचे आवश्यक ज्ञान नसलेल्या चालकांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र, थेट परवाना रद्द करण्याऐवजी सुरुवातीला चालकाला एक महिन्याची नोटीस देऊन मराठी शिकण्याची संधी दिली जाईल.

नोटीस मिळाल्यानंतरही चालकाने मराठीचे आवश्यक ज्ञान मिळवले नाही, तर त्याचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाऊ शकतो. त्यानंतरही नियमाचे पालन न केल्यास चालकाचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाईल.

ॲप-आधारित प्रवासी सेवांवर आता कडक नियंत्रण

नव्या नियमांमुळे ओला, उबेर, रॅपिडोसह इतर ॲप-आधारित रिक्षा आणि टॅक्सी सेवांच्या कामकाजावर परिवहन विभागाचे नियंत्रण वाढणार आहे. चालकांची पडताळणी, वाहनांचे GPS ट्रॅकिंग, कामाचे तास, प्रवाशांची सुरक्षा आणि भाड्याच्या वाटपावरही अधिक लक्ष ठेवले जाणार आहे.

त्यामुळे 1 सप्टेंबरपासून ॲप-आधारित रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी नियम अधिक कडक होणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर परिवहन विभागाकडून कारवाई केली जाणार आहे.

Rapido Uber OLA New Rules

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात