गोकुळच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढला; शिक्षक-पदवीधर निवडणुकीतही विजयाचा दावा, हर्षदा देशमुख-जाधव यांची महायुतीवर टीका
विशेष प्रतिनिधी
सोलापूर : ‘आमचा रांगडा पाटील जिंकला, आता शिक्षक-पदवीधरचं सोनंही आम्हीच लुटणार,’ अशा शब्दांत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी आगामी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवरून महायुतीला लक्ष्य केले. गोकुळच्या निकालाचा संदर्भ देत त्यांनी महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. त्यामुळे शिक्षक-पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. Mohite-Patil
महाविकास आघाडीच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंढरपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अभिजीत पाटील यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार राजीव खरे आणि पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव उपस्थित होत्या. या वेळी नेत्यांनी गोकुळच्या निकालाचा दाखला देत महायुतीवर टीका केली आणि आगामी निवडणुकीतही महाविकास आघाडीला यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
गोकुळच्या निकालाचा दाखला; लढवय्या नेतृत्वाचे कौतुक
गोकुळच्या निकालातून कोल्हापूरकरांनी लढवय्या नेतृत्वाच्या पाठीशी उभे राहण्याची परंपरा कायम ठेवल्याचे मोहिते-पाटील म्हणाले. हाच राजकीय कल शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही दिसून येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कोल्हापूरचा पाटील हा रांगडा असून, २४ तास जनतेमध्ये राहणारा नेता आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाला कोल्हापूरकर नेहमीच साथ देतात. एखाद्या व्यक्तीच्या विरोधात कोण आहे किंवा त्याच्या पाठीशी किती मोठी सत्ता उभी आहे, यापेक्षा त्या व्यक्तीचा जनतेसाठीचा संघर्ष महत्त्वाचा असतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
‘विजयाचा गुलाल काय असतो, हे गोकुळने दाखवले’
पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनीही गोकुळच्या निकालाचा संदर्भ देत महायुतीवर निशाणा साधला. गोकुळने सत्ताधाऱ्यांना विजयाचा गुलाल काय असतो, हे दाखवून दिले आहे. आता शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही असाच निकाल पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सुशिक्षित तरुणांमध्ये सरकारच्या विरोधात नाराजी असल्याचा दावाही त्यांनी केला. जंतर-मंतरवरील आंदोलन असो किंवा पुण्यातील विद्यार्थ्यांचे आंदोलन, विविध प्रश्नांवर तरुणांकडून व्यक्त होणारा असंतोष दुर्लक्षित करता येणार नाही, असे त्या म्हणाल्या. तरुणांच्या प्रश्नांबाबत सरकारविरोधात असलेली नाराजी मतदानातून व्यक्त होईल आणि आगामी २३ तारखेला तरुणाईचा संताप मतांच्या माध्यमातून दिसून येईल, असा दावाही त्यांनी केला.
‘काल उठून आज पळायला सुरुवात केलेली नाही’
दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव यांच्यावर टीका करत विजयाचा विश्वास व्यक्त केला.
कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते सज्ज असून, तयारी आधीपासूनच नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
‘आम्ही काल उठून आज पळायला सुरुवात केलेली नाही,’ असे म्हणत त्यांनी महायुतीच्या उमेदवारावर निशाणा साधला. महाविकास आघाडीची तयारी मजबूत असून, निवडणुकीत विजय आपलाच होईल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गोकुळच्या निकालानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे या वक्तव्यांवरून दिसत आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत तरुणांचे प्रश्न, सरकारच्या कारभाराबाबतची नाराजी आणि संघटनात्मक तयारी हे मुद्दे प्रचाराच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. मात्र, या राजकीय दाव्यांचे प्रतिबिंब प्रत्यक्ष मतदानात कितपत उमटते, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App