विशेष प्रतिनिधी
मुंबई : छगन भुजबळांच्या विरोधात एकीकडे चुचकारणी आणि दुसरीकडे फटकारणी, असे राजकारण सुरू झाले असून याची सुरुवात उपमुख्यमंत्री अजितदादांनी केली. भुजबळ संतापून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेल्यानंतर राष्ट्रवादीतली मराठा लॉबी आक्रमक झाली असून या लॉबीने भुजबळांच्या विरोधात जुनी राजकीय प्रकरणे बाहेर काढून त्याचा बदला अजितदादांनी घेतल्याची भावना तयार करायला सुरुवात केली आहे.Maratha lobby in NCP up against chagan bhujbal
देवेंद्र फडणवीस यांना छगन भुजबळ भेटायला गेल्यानंतर फडणवीस यांनी त्यांच्याकडे 8-10 दिवसांचा वेळ मागून त्यांच्या मंत्रिपदासंदर्भात तोडगा काढायचे आश्वासन दिले. त्यावर अजित पवारांनी भुजबळांचे बंड हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे. तो आम्ही आमच्या पद्धतीने सोडवू, पण भुजबळ लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात, अशी मखलाशी केली होती.
त्यानंतरच राष्ट्रवादीतली मराठा लॉबी छगन भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक झाली. सुरुवातीला नाशिक मधले त्यांचे प्रतिस्पर्धी आणि राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भुजबळ यांच्यावर तोफ डागली. भुजबळांना ओबीसी कार्ड खेळताना फक्त मुलगा आणि पुतण्याच आठवतात. ते जातीयवादी राजकारण करतात, असा आरोप माणिकरावांनी केला.
माणिकराव कोकाटे यांच्या पाठोपाठ भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी छगन भुजबळ यांच्यावर तोफ डागली. अजितदादांनी 2009 चा राजकीय बदला घेतला, असे विलास लांडे म्हणाले. त्यांनी त्यावेळचा घटनाक्रम सांगितला.
2009 मध्ये अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळात शरद पवारांनी छगन भुजबळ यांना उपमुख्यमंत्री केले, पण त्यावेळी आमदार अजित पवारांच्या पाठीशी होते, तरी देखील पवारांनी आपले वजन भुजबळांच्या पारड्यात टाकले होते, पण नंतर आदर्श घोटाळ्यामध्ये अशोक चव्हाण यांना राजीनामा द्यायला लागल्यानंतर आपोआपच भुजबळांचे उपमुख्यमंत्री पद गेले. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळाच्या वेळी राष्ट्रवादीतली मते आजमावली गेली, त्यावेळी आमदारांनी भुजबळ यांच्या ऐवजी अजितदादांच्या पारड्यात मते टाकली. त्यावेळी शरद पवारांनी आमदारांचे ऐकून अजितदादांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री केले. अजितदारांचे उपमुख्यमंत्री पद भुजबळ यांनी सुरुवातीला पटकावले होते, याचा बदला आता अजितदादांनी घेतला, असे विलास लांडे म्हणाले.
एकट्या भुजबळ यांनाच किती पदे द्यायची??, असा सवाल करून विलास लांडे यांनी भुजबळांच्या बंडातली हवा काढून घेतली. आधी माणिकराव कोकाटे आणि आता विलास लांडे यांच्यासारखे नेते भुजबळ यांच्या विरोधात आक्रमक झाल्यानंतर राष्ट्रवादीची मराठा लॉबी ऍक्टिव्हेट करण्यात आल्याचा राजकीय डाव उघड्यावर आला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App