विशेष प्रतिनिधी
पुणे: शहरात अनधिकृत जाहिरात फलक उभारणाऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. कारण महानगरपालिकेने अनधिकृत जाहिरात फलकांवरील दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. वाढीव दंडामुळे ही कारवाई अधिक प्रभावी करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. अनधिकृत फलकासाठी पूर्वी ५० हजार रुपये दंड होता, आता तो थेट दोन लाख रुपये करण्यात आला आहे. तर अनधिकृत बोर्ड, बॅनर आणि फ्लेक्स लावणाऱ्यांकडून प्रतिदिन एक हजार रुपयांऐवजी दोन हजार रुपये दंड घेतला जाणार आहे.
शहरातील अनधिकृत जाहिरात फलक, फ्लेक्सवर महापालिका दंडात्मक कारवाई करते; पण हा दंड कमी असल्याने शुल्क बुडवून चमकोगिरी करणारे राजकीय नेते, संस्था, फलक व्यावसायिकांना आर्थिक भुर्दंडाचा त्रास होत नव्हता. पण आता महापालिकेने वाढवलेल्या दंडामुळे अनधिकृत जाहिराती करणारे, फलक उभारणाऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज, फ्लेक्स आणि बॅनरबाजीला आळा घालण्यासाठी दंडाच्या रकमेत मोठी वाढ महानगरपालिकेने केली आहे.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
यासंदर्भात प्रशासनाने परिपत्रकही काढले. शहरातील अनधिकृत जाहिरात फलकांवरील कारवाईचे विकेंद्रीकरण करण्यात आले असून, महापालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांमार्फत दररोज कारवाई केली जाते. वाढीव दंडामुळे ही कारवाई अधिक प्रभावी करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. राजकीय कार्यक्रम, वाढदिवस, स्वागत समारंभ आणि व्यावसायिक जाहिरातींच्या नावाखाली सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणाऱ्या फ्लेक्सवरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे, अशी माहिती आकाशचिन्ह विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली आहे.
अशी असेल दंडाची रक्कम
अनधिकृत बोर्ड, बॅनर, फ्लेक्स लावल्यास प्रतिफलक प्रतिदिन दोन हजार रुपये दंड, अनधिकृत जाहिरात फलक पाडण्याचा दंड ५० हजार रुपयेऐवजी दोन लाख रुपये, तात्पुरत्या स्वरूपातील जाहिरातीसाठी प्रतिचौरस फूट प्रतिदिन ४० रुपये, अनधिकृतपणे दुचाकीवरून जाहिरात केल्यास पाच हजार रुपये दंड, तीन चाकीवरील विनापरवानगी जाहिरातीस दहा हजार रुपये दंड, चारचाकी व अन्य मोठ्या वाहनांवरील जाहिरातीस २५ हजार रुपये दंड आकारला जाईल.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App