विशेष प्रतिनिधी
पुणे: पुण्यातील शिवाजीनगर सत्र न्यायालयाबाहेर बुधवारी (25 नोव्हेंबर) दुपारी जामिनावर सुटलेला आरोपी मंदार मारुती किवळे (वय 35) याच्यावर गोळीबार आणि कोयत्याने सपासप वार करून दोन्ही हातांचे पंजे छाटल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केलेल्या 6 आरोपींना गुरुवारी (26 नोव्हेंबर) न्यायालयाने 2 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे गुन्हे शाखेने वेगाने तपास करत हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अक्षय सुभाष चव्हाण (वय 20) आणि अमोल रामचंद्र चव्हाण (वय 48) यांना पुण्यातून, तर दौंडमार्गे सोलापूरच्या दिशेने पळून जाणाऱ्या स्वप्निल बाजीराव गवळी (वय 28), ओंकार संतोष पवार (वय 18) आणि सूरज साधू मालेकर (वय 22) या 3 हल्लेखोरांना दौंड परिसरात नाकाबंदी करून अटक केली; याशिवाय एका अल्पवयीन बालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे.
मंदार किवळेच्या जबाबातून थरार उघड; अर्ध्या गुंठा जमिनीच्या वादाची पार्श्वभूमी
ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी मंदार किवळे याने पोलिसांना दिलेल्या जबाबातून आणि पोलीस तपासातून या रक्तरंजित सूडाची संपूर्ण माहिती समोर आली आहे.
18 नोव्हेंबर 2026 रोजी जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेला मंदार किवळे बुधवारी दुपारी 12.45 च्या सुमारास कोर्टाबाहेर आला असता हल्लेखोरांनी त्याला गाठले. “तूच आमच्या शुभमला मारलं ना?” असे विचारत झाडलेली गोळी चुकल्यानंतर हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून त्याचे दोन्ही हातांचे पंजे छाटले आणि “आम्हीच कात्रजचे भाई आणि राजे आहोत” अशी घोषणाबाजी करत दुचाकींवरून पळ काढला.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
जमिनीचा वाद आणि हत्येचा बदला
कात्रजच्या संतोषनगरमधील अर्ध्या गुंठा जमिनीच्या वादातून 20 एप्रिल 2025 रोजी मंदार किवळे, अमर साकोरे, गिरीष वावरे आणि योगेश डोरे यांनी शुभम सुभाष चव्हाण (वय 28) याची हत्या केली होती. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अक्षय चव्हाणने मंदार जामिनावर सुटताच 5 ते 6 दिवसांत हा कट तडीस नेला.
भरदिवसा न्यायालयाच्या दारात घडलेल्या या घटनेवरून राज्यातील राजकारणही तापले असून नेत्यांनी आपापल्या भूमिका मांडल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस: पुणे आणि मुंबईतील गोळीबाराच्या घटनांवर मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशा घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशारा दिला आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार: ही घटना अत्यंत दुर्दैवी असून दोषींना पाठीशी घातले जाणार नाही; अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवण्याचे आदेश पोलिसांना दिल्याचे पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
खासदार सुप्रिया सुळे: गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात पहिल्या तर पुणे शहर चौथ्या क्रमांकावर असल्याचा दावा करत, मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुण्याचे पालकत्व घेऊन ही गुन्हेगारी थांबवावी, अशी विनंती खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App