ठाण्याच्या युवा खेळाडू शौर्या अंबुरेने युवा ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावत भारताची मान उंचावली. दुखापतीनंतर जिद्द आणि कठोर मेहनतीच्या जोरावर तिने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : जिद्द, मेहनत आणि कठोर परिश्रम यांच्या जोरावर कोणतेही आव्हान पार करता येते, हे ठाण्याच्या युवा धावपटू शौर्या अंबुरे हिने सिद्ध करून दाखवले आहे. डकार (सेनेगल) येथे पार पडलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धा २०२६ मध्ये शौर्याने महिलांच्या १०० मीटर हर्डल्स (अडथळा शर्यत) प्रकारात कांस्यपदक पटकावून भारताचा गौरव वाढवला आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
शौर्या अंबुरे हिने दुखापतीवर मात करत आंतरराष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश विशेष कौतुकास्पद आहे. दुखापतीमुळे निर्माण झालेल्या अडचणींवर मात करत तिने पुन्हा मैदानात दमदार पुनरागमन केले. सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द यांच्या जोरावर तिने युवा ऑलिम्पिकमध्ये पदकाला गवसणी घातली.
खडकवासला-फुरसुंगी बोगद्याचे ६ किलोमीटर काम पूर्ण; दौंड, इंदापूर, बारामतीला मिळणार दिलासा
दरम्यान, शौर्या अंबुरे हिची भेट घेऊन तिच्या यशाबद्दल अभिनंदन करण्यात आले. यावेळी तिच्या आतापर्यंतच्या क्रीडा प्रवासाबद्दल, दुखापतीनंतर केलेल्या संघर्षाबद्दल आणि भविष्यातील ध्येयांबद्दल जाणून घेण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करताना तिने दाखवलेली चिकाटी आणि कामगिरी उंचावण्याची महत्त्वाकांक्षा प्रेरणादायी असल्याचे कौतुक करण्यात आले.
शौर्याने मिळवलेले कांस्यपदक हे केवळ तिच्या वैयक्तिक मेहनतीचे फळ नसून महाराष्ट्रातील नवोदित खेळाडूंसाठीही प्रेरणादायी उदाहरण आहे. योग्य संधी, कठोर मेहनत आणि जिद्द असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही यश मिळवता येते, हे तिने आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे.
शौर्या अंबुरे हिने भविष्यातही अशीच उत्तुंग भरारी घेत महाराष्ट्रासह भारताचे नाव जागतिक क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App