विशेष प्रतिनिधी
बारामती : महात्मा फुलेनगर-बिजवडी येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सलग चौथ्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी छगन भोंगळे यांची निवड करण्यात आली. गुरुवारी (ता. १२) झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडी जाहीर करण्यात आल्या.
कारखान्याची २०२६-२०३१ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच बिनविरोध पार पडली होती. विशेष म्हणजे कारखान्याची सलग दुसरी पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यानंतर अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली.
अध्यक्षपदासाठी हर्षवर्धन पाटील, तर उपाध्यक्षपदासाठी छगन भोंगळे यांचे प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी डॉ. यशवंत माने यांनी दोन्ही निवडी बिनविरोध झाल्याचे जाहीर केले. निवडीनंतर हर्षवर्धन पाटील आणि छगन भोंगळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी कारखान्याच्या आगामी कामकाजाबाबत माहिती दिली. कर्मयोगी कारखाना आणि ओंकार शुगर अँड डिस्टिलरी यांच्या सहयोगातून कारखान्याचे कामकाज सुरू असून, शासनाच्या मान्यतेने झालेल्या या कराराचे पहिले वर्ष पूर्ण झाले आहे. आता दुसरे वर्ष सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
चालू २०२६-२७ चा गळीत हंगाम शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. गत हंगामासाठी प्रतिटन ३ हजार ३५० रुपये दर जाहीर करण्यात आला असून, त्यातील उर्वरित प्रतिटन १५० रुपयांची रक्कम येत्या दोन दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. शेतकरी आणि कर्मचारी हेच कारखान्याच्या कामकाजाचे केंद्रबिंदू राहतील. संचालक मंडळाचे कामकाज पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एकजुटीने केले जाईल. शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस कर्मयोगी कारखान्याला द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, खासदार पार्थ पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, शेतकरी संघटना आणि सभासदांनी सहकार्य केल्याबद्दल हर्षवर्धन पाटील यांनी आभार मानले. यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळाचेही स्वागत करण्यात आले. संचालक, कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय शिर्के, जनरल मॅनेजर रणजित तावरे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन कार्यालयीन अधीक्षक शरद काळे यांनी केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App