विशेष प्रतिनिधी
बारामती : राज्यात यंदा दुष्काळाचे सावट गडद झाले असून, शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाऊबीजेच्या दिवशी इंदापूर तालुक्यातील घोरपडवाडी येथील लावंड वस्तीवर एका शेतकऱ्याच्या घरी जाऊन दिवाळी साजरी केली.
दिवाळीचा सण आनंदाचा असला, तरी यंदा दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या घरातील उत्साहावर विरजण पडले आहे. शेतीला पाणी नाही, जनावरांच्या चाऱ्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावेळी बोलताना भरणे म्हणाले, यंदाचे वर्ष शेतकऱ्यांच्या दृष्टीने संकटाचे आहे. दुष्काळाचे संकट मानवनिर्मित नसून नैसर्गिक आहे. मात्र, या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या पाण्याचे नियोजनही सरकारने केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत नियोजन केले असून, अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत केली जाईल.
शेतकऱ्यांनी नीरा डावा कालव्यातून पाणी सोडण्याची मागणी केली आहे. याबाबत जलसंपदामंत्री विखे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे भरणे यांनी सांगितले. शेतकऱ्यांची पाण्याची मागणी रास्त असून त्यांना पाणी मिळण्यासाठी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही ते म्हणाले.
अग्रीम पीकविमा मदत आणि कर्जमाफीच्या प्रश्नावरही त्यांनी भाष्य केले. कोणताही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. कागदपत्रांच्या त्रुटींमुळे काही शेतकऱ्यांची कर्जमाफी रखडली असून, त्याबाबतचे काम सुरू आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर मदत दिली जाणार आहे, असे भरणे यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App